ठाकरेंच्या कल्पनेतील शिवभोजन थाळी सुरुच राहणार : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई तक

• 03:21 AM • 27 Sep 2022

मुंबई : ठाकरे सरकारच्या काळातील शिवभोजन थाळी सुरुच राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला असल्याने ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरु होती. योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसण्याची शक्याता होती. मात्र आता ही योजना सुरुच राहणार असल्याचे जाहीर केल्याने गोर-गरिबांना मोठा दिलासा मिळाला […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : ठाकरे सरकारच्या काळातील शिवभोजन थाळी सुरुच राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला असल्याने ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरु होती. योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसण्याची शक्याता होती. मात्र आता ही योजना सुरुच राहणार असल्याचे जाहीर केल्याने गोर-गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचलं का?

शिवभोजन थाळी योजना अंतर्गत राज्यातील गोर-गरिब जनतेला १० रूपयांमध्ये जेवण मिळते. कोरोना काळात या थाळीची किंमत 5 रूपये करण्यात आली होती. राज्यात १ लाख ८८ हजार ४६३ थाळ्यांची विक्री होते. याची संख्या २ लाखांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारने आणला होता. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाते.

शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय :

दरम्यान या योजनेत गैरव्यवहार होत असल्याचा संशय शिंदे फडणवीस सरकारला आहे. बोगस नावं, बोगस केंद्र असल्याचा संशय आहे. ही योजना ठाकरे सरकारची आहे. यामुळेच मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या योजनेचा आढावा घेतला. यामुळे ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून ही योजना सुरु ठेवण्याची विनंती केली. त्यावर फडणवीस यांनीही ही योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन देऊन केवळ आढावा घेण्यात आल्याचे सांगितले.

शिवभोजन थाळी योजना काय आहे?

राज्यातील गरीबांना, गरजूंना सहज आणि अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात, रुग्णालय, एसटी स्टँड अशा ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत.

शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे. केंद्र चालकांना सरकारकडून ग्रामीण भागातील एका थाळीमागे ५० रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ३५ रुपये अनुदान देण्यात येते.

    follow whatsapp