कल्याणमध्ये शिवसेना उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर तलवारीने हल्ला

मुंबई तक

• 08:50 AM • 20 Jul 2022

-मिथिलेश गुप्ता, कल्याण नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेला २४ तास लोटत नाही, तोच कल्याणमध्ये उपशहरप्रमुखावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाला आहे. शिवसेनेचे कल्याण उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी (२० जुलै) सकाळी तलवार आणि रॉडने हल्ला करण्यात आला. यात पालांडे गंभीर जखमी झाले. कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर आज सकाळच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी […]

Mumbaitak
follow google news

-मिथिलेश गुप्ता, कल्याण

हे वाचलं का?

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेला २४ तास लोटत नाही, तोच कल्याणमध्ये उपशहरप्रमुखावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाला आहे. शिवसेनेचे कल्याण उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी (२० जुलै) सकाळी तलवार आणि रॉडने हल्ला करण्यात आला. यात पालांडे गंभीर जखमी झाले.

कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर आज सकाळच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या प्राणघातक हल्ल्यात पालांडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर आरोप

हर्षवर्धन पालांडे हे उद्धव ठाकरे समर्थक आहेत. शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा आरोप, हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे.

‘मी नेहमीप्रमाणे कामाला जात होतो. त्यांनी माझी गाडी अडवली आणि शिवसेनेत पुढे पुढे करतो म्हणाले. नंतर मला दोन्ही बाजूंनी घेरलं आणि तलवार काढली. त्यानंतर मला बाहेर ओढत असताना मी निसटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी वार केला. यात मला डोक्याला आणि कमरेवर लागलं,’ असं हर्षवर्धन पालांडे म्हणाले.

पालांडे यांनी केलेला आरोप महेश गायकवाड यांनी फेटाळला आहे. ‘मला प्रसारमाध्यमांमधून कुणावर तरी हल्ला झाला असल्याचं कळलंय. हे दुर्दैवी आहे. या घटनेशी माझा काडीमात्र संबंध नाही. मी लोकप्रतिनिधी असून, १५ वर्षांपासून समाजकारणात आहे. पोलिसांनी तपास करून कारवाई करावी,’ अशी मागणी करत ‘माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करू,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेना उपशहरप्रमुखावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत. हर्षवर्धन पालांडे यांच्यावरील हल्ल्यामागे कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अंतर्गत गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा सुरू झालीये.

नाशिकमध्ये बाळा कोकणे यांच्यावर हल्ला

नाशिक शहरातही शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर सोमवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते.

त्यांची दुचाकी एमजी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ येता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यातच वार केल्यानं बाळा कोकणे हे गंभीर जखमी झाले. परिसरातील व्यक्तींनी कोकणे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. या प्रकरणी नाशिकमधील भद्रकाली पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

    follow whatsapp