नवी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लावल्याचा आरोप असलेल्या दीप सिद्धूच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. दीप सिद्धूच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. याव्यतिरीक्त दिल्लीमधील ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झालेल्या चार जणांच्या अटकेसाठीही दिल्ली पोलिसांनी ५० हजाराचं बक्षीस जाहीर केलंय.
ADVERTISEMENT
प्रजासत्ताक दिनाच्या वेळी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी SIT ची स्थापना केली असून जॉईंट कमिशनर बी.के.सिंग हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराची दखल दिल्ली उच्च न्यायालयानेही घेतली असून हिंसाचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी दिल्लीत गेल्या काही महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आपला विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर रॅलीची परवानगी मागितली होती. या रॅलीत शेतकऱ्यांनी हिंसाचार करत दिल्ली पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दीप सिद्धूने आपल्या भाषणांमधून हिंसाचाराला प्रेरणा दिली असाही आरोप त्याच्यावर होतो आहे.
ADVERTISEMENT