दिल्लीतील मंगोलपुरी भागातील भाजप कार्यकर्ता रिंकू शर्मा यांच्या हत्येवरुन राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी गोळा करायच्या कामात सहभागी झाल्यामुळे रिंकूची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजप आणि विंहीपने केला आहे. रिंकूच्या परिवारानेही हेच आरोप केले आहेत. दरम्यान दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार युवकांनी रिंकूची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. बर्थ-डे पार्टीत रेस्टॉरंट सुरु करण्यावरुन झालेल्या वादानंतर आरोपींनी रिंकूची हत्या केली. याप्रकरणी मोहम्मद दानिश, मोहम्मद इस्लाम, जाहीद आणि मोहम्मद मेहताब या चार आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दानिश आणि इस्लाम हे टेलरिंगचं काम करतात तर जाहीद हा कॉलेजचा विद्यार्थी आहे. मेहताब हा १२ वी मध्ये शिकत आहे.
रिंकूच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, “बुधवारी संध्याकाळी रिंकू एका बर्थ-डे पार्टीसाठी गेला होता. त्या पार्टीवरुन घरी येत असताना एका पार्कजवळ काही लोकांनी त्याला धरलं आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. हा वाद वाढल्यानंतर रिंकू घरी आला, यानंतर रिंकूचा माग काढत आरोपीही घरापर्यंत पोहचले आणि त्यांनी रिंकूना मारहाण करत चाकूने त्याच्यावर हल्ला केला.” यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाला.
रिंकूच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, रिंकूला हॉस्पिटलमध्ये दाखल करताना चाकू त्याच्या पाठीतच होता. याचसोबत हल्ला करणाऱ्यांपैकी एकाने रिंकूच्या घरातील LPG सिलेंडरही उघडला होता. २५ वर्षीय रिंकू हा एका खासगी हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशीअन म्हणून काम करत होता. रिंकू हा भाजपचा कार्यकर्ता होता. राम मंदिराच्या कार्यक्रमात तो सहभागी होत असल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्याच आल्याचा आरोप भावाने केला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या चौकशीतून काय गोष्टी समोर येतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT