शिवसेनेत उभी फूट पडल्याने ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत पार पडणार आहेत. दसरा मेळाव्याचं औचित्य दोन्ही गटांनी साधलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार आहेत. तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळावा घेणार आहेत. अशात एकमेकांवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दोन्ही गटांनी टीका करताना मर्यादा पाळावी असा सल्ला दिलाय. त्याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं होतं शरद पवार यांनी?
शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यांबद्दल शरद पवार म्हणाले, “दुर्दैव आहे की, एका पक्षाचे दोन भाग झालेत आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झालीये. ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सुत्रं दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. गंमत अशी आहे की या गोष्टी होत राहतात. असं काही नवीन नाही. संघर्ष होतो, पण त्याला एक मर्यादा ठेवली पाहिजे. ती मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही.”
“राज्याच्या जबाबदार लोकांनी हे वातावरण दुरुस्त करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. ती पावलं टाकण्याची जबाबदारी आमच्यासारख्या वरिष्ठ लोकांप्रमाणेच, राज्याचे जे प्रमुख आहेत (एकनाथ शिंदे). ते पक्षाचे प्रमुख असतील, पण ते (एकनाथ शिंदे) राज्याचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रातल्या १४ कोटी लोकांचे ते (एकनाथ शिंदे) प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर (एकनाथ शिंदे) ही जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून (एकनाथ शिंदे) अशी अपेक्षा करूया की ते जी मांडणी मांडतील त्यातून कटुता न वाढेल अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी (उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे) केली, तर राज्यातलं वातावरण सुधारायला मदत होईल” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?
शरद पवार यांनी सल्ला देत राहिलं पाहिजे हे खरोखर चांगलं आहे. त्यांनी असे सल्ले तर दिलेच पाहिजेत. तसंच त्यांच्या लोकांनाही त्यांनी सल्ले द्यावेत आणि थोडा अधिकचा सल्ला नाना पटोले यांनाही द्यावा असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT