अंधेरी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला सुरू झालेली असतानाच आता निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भेट घेतल्यानंतर मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरीची पोटनिवडणूक भाजपनं लढू नये, अशी विनंती केलीये. राज ठाकरेंच्या विनंतीचा गांभीर्यानं विचार करू, असं म्हणत फडणवीसांनी सविस्तर भूमिका मांडलीये.
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांच्या पत्राबद्दल माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची सकाळी भेट घेतली आणि अंधेरी पोटनिवडणुकीत त्यांनी (मनसे) भाजपच्या उमेदवाराचं समर्थन करावं. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि आता एक पत्रही त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी अशी विनंती केलीये की आम्ही (भाजप) उमेदवार उभा करू नये किंवा तो (मुरजी पटेल) परत घ्यावा.”
राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मी एव्हढंच सांगू शकेन की भाजपमध्ये मी काही एकटा निर्णय करू शकत नाही. त्यांच्या (राज ठाकरे) पत्रावर मला निर्णय करायचा असेल, तरीही मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरती पक्षाशीही चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार घोषित केलाय आणि दिला देखील,” असं देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या विनंतीवर बोलताना म्हणाले.
भाजपनं वेळोवेळी अशा भूमिका घेतल्यात; उमेदवार मागे घेण्याबद्दल फडणवीसांनी दिलं उत्तर
“यापूर्वी जेव्हा जेव्हा आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली. त्या त्या वेळी आम्ही ती भूमिका घेतलेली आहे. असं नाही की तशी भूमिका घेतलेली नाही. आर. आर. पाटलांच्या वेळी घेतली होती. अलिकडेच विधान परिषदेच्या निवडणुकीवेळीही घेतलीये. पण, आता स्थितीला जर त्यासंदर्भात काही भूमिका असेल, तर ती मला घेता येत नाही. त्यासंदर्भात आमच्या पक्षात चर्चा करावी लागेल”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या विनंतीवर बोलताना दिलीये.
‘भाजपनं अंधेरीची पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा, फडणवीसांना पत्र
“मुख्य म्हणजे आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशीही (एकनाथ शिंदे) मला चर्चा करावी लागेल. त्यामुळे ही सगळी चर्चा झाल्यानंतरच या पत्रासंदर्भात मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करू शकेन. ठिके आहे. त्यांनी (राज ठाकरे) चांगल्या भावनेनं पत्र पाठवलं आहे. आम्ही त्या पत्राचा गांभीर्यानं विचार करू. पण निर्णय जो घ्यायचा आहे, तो चर्चेअंतीच घेता येईल. त्याशिवाय घेता येणार नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या पत्रावर बोलताना मांडली आहे.
ADVERTISEMENT