मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (24 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्य ‘शिवतीर्थ’ या नव्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील त्यांच्यासोबत होत्या. एकीकडे राज्यात अनेक राजकीय घडामोडी सुरु असताना खुद्द फडणवीसांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, असं असलं तरी या भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. सूत्रांच्या मते, ही भेट कौटुंबिक होती. नुकतंच राज ठाकरे हे ‘शिवतीर्थ’ या आपल्या नव्या घरात राहण्यासाठी गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह गृहप्रवेश केला होता. तेव्हापासून अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते हे राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी जरी आज सदिच्छा भेट घेतली असली तरीही या भेटीत राजकीय चर्चा नक्कीच झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थच्या गॅलरीत उभं राहून काही वेळ गप्पा मारत असल्याचंही पाहायला मिळालं. याचा व्हीडिओ देखील कॅमेऱ्यात कैद झाला असून आता तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.
राज-देवेंद्र भेटीत पुन्हा युतीची चर्चा?
2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण हे पूर्णपणे बदलून गेलं एकत्र विधानसभा निवडणूक लढवलेल्या शिवसेना आणि भाजप हे निवडणुकीच्या निकालानंतर मात्र वेगवेगळे झाले. गेली अनेक वर्ष युतीत असलेले हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले. त्यामुळे आता भाजपला राज्यात नव्या राजकीय पक्षाची गरज भासू लागली आहे. अशावेळी राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा त्यांना अधिक जवळचा वाटू लागला असल्याची चर्चा आहे.
आगामी काळात भाजप आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता वारंवार वर्तवली जाते. अशावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आजची भेट ही महत्त्वाची मानली जात आहे. ही भेट जरी कौटुंबिक असली तर या भेटीत राजकीय चर्चा नक्कीच झाली असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावेळी युतीबाबत देखील चर्चा झाली असण्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
मात्र, असं असलं तरीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. पण या भेटीमुळे राज्यातील राजकारणात मात्र नवा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेसह अनेक महापालिका निवडणुका होणार आहेत. अशावेळी राज्यात विरोधी पक्षात असलेल्या या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असल्याने हे युतीचे संकेत तर नाही ना?
ADVERTISEMENT