इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. शिंदे गटातल्या १६ आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी करतण्यात आली आहे. ठाकरे गट त्यासाठी आक्रमक आहे. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माझी खासदार चंद्रकांत खैरेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे सरकार पडणार असल्याने चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडण्याची तयारी केली आहे असा दावा त्यांनी केला आहे.
काय म्हटलं आहे चंद्रकांत खैरे यांनी?
देवेंद्र फडणवीस यांना हे माहित आहे की हे सरकार पडणार आहे. सुप्रीम कोर्टात १६ आमदारांना अपात्र ठरवलं जाईल. त्यामुळे आमचे जुने मित्र असलेले देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. २२ आमदार फोडण्याची त्यांची तयारी आहे. त्यानंतर हे सरकार जाईल आणि फडणवीस मुख्यमंत्रीही होऊ शकतात असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेत जून महिन्यात फूट पाहण्यास मिळाली तशीच फूट आता काँग्रेसमध्येही पाहण्यास मिळणार का? या चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत.
४० आमदारांपैकी पुन्हा कुणीच निवडून येणार नाही
आत्ता जे भाजपसोबत गेलेले आमच्या पक्षातले आमदार आहेत त्या ४० जणांपैकी कुणीही निवडून येणार नाही असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातून उभे राहिले तरीही निवडून येणार नाहीत कारण शिवसेनेशी, बाळासाहेब ठाकरेंशी आणि उद्धव ठाकरेंशी त्यांनी गद्दारी केली आहे असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. जनता यांना यांची जागा दाखवून देईल. छगन भुजबळ पडले, नारायण राणे पडले तर हे कोण आहेत? असाही प्रश्न खैरे यांनी केला.
अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका
चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांवरही टीका केली. अब्दुल सत्तार आमच्या ताकदीमुळे निवडून आला. उद्धव ठाकरेंपुढे अब्दुल सत्तार यांनी हात जोडले होते. मला निवडून आणा म्हणून. अब्दुल सत्तार हा रंग बदलणारा सरडा आहे असंही खैरे यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांचं चंद्रकांत खैरेंना उत्तर
चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याबाबत जेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ज्यांचा स्वतःचा पक्ष फुटला आहे अशा लोकांनी आमच्याबाबत बोलू नये असा खोचक टोला नाना पटोले यांनी चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे. मात्र चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्यामुळे नेमकं काय घडणार? काँग्रेसलाही सुरुंग लागणार का? या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT