आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आज स्वतःसाठी दिल्लीत जात आहेत की महाराष्ट्रासाठी असा खोचक प्रश्न विचारत टीका केली. फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टवरून आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्प गुजरातला का गेला? यासंदर्भात सरकारकडून अद्यापही कुठलंच अधिकृत उत्तर आलेलं नाही. आरोप-प्रत्यारोप झाले. आवाज उठवल्यानंतर चौकशीची धमकीही दिली जाते. मात्र अजूनही महाराष्ट्रातून एवढा मोठा प्रकल्प गुजरातला का गेला? याबाबत सरकारकडून स्पष्ट उत्तर देण्यात आलेलं नाही.
बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकार असताना रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळ जागा घेतली होती. त्यासाटी अडीच हजार कोटींची जागाही दिली होती. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारकडे अप्लायही केला त्यावेळी आंध्र प्रदेश, हिमाचल आणि गुजरातला प्रकल्प गेला पण हा प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. हा प्रकल्प आला असता तरीही राज्यात जवळपास ७० हजार तरूणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत स्वतःसाठी गेले आहेत की महाराष्ट्रासाठी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत स्वतःसाठी गेले आहेत की महाराष्ट्रासाठी असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. काही भेटी जगजाहीर होत्या, मला वाटतं जगजाहीर केलेली ही आठवी भेट असेल तर लपूनछपून केलेल्या भेटी मोजल्या तर बारावी भेट असेल त्यात मला पडायचं नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?
वांद्रे-अंधेरी सी लिंकचं काम हे मुंबईत सुरू आहे, पण या कामासंबंधी मुलाखती मात्र चेन्नईमध्ये घेतल्या जात आहेत, त्यामुळे भूमीपुत्रांचं काय असा सवाल शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांवर लक्ष द्यायला हवं अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “आज मी कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने आज रोजगार आणि विकासाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. वांद्रे- अंधेरी सी लिंकचा प्रकल्प हा मुंबईमध्ये होणार आहे.पण त्यासाठी येत्या रविवारी चेन्नईमध्ये मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांच्या हक्काचं काय असा प्रश्न निर्माण होतोय. मला चेन्नई किंवा गुजरातवर आक्षेप नाही, पण काम जर मुंबईत असेल तर मग केवळ चेन्नईमध्ये मुलाखती का? त्याचसोबत मुंबई, ठाणे, संभाजीनगर या सारख्या शहरातही मुलाखती व्हाव्यात.” अशीही मागणी त्यांनी केली.
ADVERTISEMENT