मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता राज्याचे नवे गृहमंत्री हे दिलीप वळसे-पाटील हे असणार आहेत. अनिल देशमुखांनंतर गृह खात्याचा कारभार हा दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात येईल असं वृत्त ‘मुंबई तक’ने २१ मार्च २०२१ रोजीच दिलं होतं. ज्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे.
ADVERTISEMENT
दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं देण्यात आल्याने त्यांच्याकडे आधीच असणारी खाती ही इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
Anil Deshmukh Resign: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडे जाणार गृहमंत्रीपद?
पाहा नवे खातेबदल नेमके कसे आहेत.
-
गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
-
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ देण्यात आला आहे.
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
दिलीप वळसे-पाटील: शरद पवारांचे पीए ते महाराष्ट्राचे गृहमंत्री, पाहा आतापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे:
1. दिलीप वळसे-पाटील हे आता महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री असणार आहेत. राजकारणातील सुसंस्कृत चेहरा म्हणून वळसे-पाटलांकडे पाहिलं जातं. त्यामुळे आता अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्री पद देण्यात आले आहेत.
2. दिलीप वळसे-पाटील हे पुण्यातील आंबेगाव मतदारसंघातून 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
3. वळसे-पाटील हे पक्षाचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि स्वच्छ चारित्र्याचा चेहरा म्हणून पाहिलं जातं
4. त्यांनी याआधी वैद्यकीय शिक्षण, वित्त आणि उर्जा यासारखी खाती देखील त्यांनी सांभाळली आहेत.
5. वळसे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘ट्रॅबल शूटर’ म्हणून ओळखले जातात.
6. दरम्यान, विलासराव देशमुख यांचं सरकार असताना लोडशेडिंग हा गंभीर मुद्दा बनला होता. त्यावरुन अनेक आंदोलनं सुरु होती. त्यानंतर उर्जा खातं हे दिलीप वळसे-पाटलांकडे सोपवण्यात आलं होतं.
7. २००९ ते २०१४ दरम्यान दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलं होतं
अनिल देशमुख यांना का द्यावा लागला राजीनामा?
सचिन वाझेंना झालेली अटक, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली होती. परमबीर सिंग यांना होमगार्ड विभागात टाकून हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.
या बदलीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता. याव्यतिरीक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी सुरु असलेल्या रॅकेटचाही परमबीर यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला होता. दरम्यान परमबीर सिंग यांच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षण नोंदवली होती आणि त्यानंतर कोर्टाने सीबीआयची चौकशीचे आदेश दिला.
हायकोर्टाच्या याच आदेशांनंतर अनिल देशमुख यांना अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
ADVERTISEMENT