अजित पवारांचा थेट इशारा : सत्तेचा माज करू नका; आम्ही कधी सत्तेत आलो कळणारही नाही

मुंबई तक

• 04:26 AM • 03 Oct 2022

माण (सातारा) : दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ (तात्या) यांच्यानंतर माण तालुक्यात खूपच गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू आहे. सध्याचे चाळीस लोकांचे सरकार राज्याचा विकास करायचे सोडून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहेत. पण विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असा गर्भित इशारा माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. मार्डी […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

माण (सातारा) : दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ (तात्या) यांच्यानंतर माण तालुक्यात खूपच गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू आहे. सध्याचे चाळीस लोकांचे सरकार राज्याचा विकास करायचे सोडून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहेत. पण विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असा गर्भित इशारा माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

हे वाचलं का?

मार्डी (ता. माण) येथे दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

जयकुमार गोरेंवर टीका

माणमध्ये काहीजण अपक्ष निवडून येतात, पुन्हा काँग्रेसमध्ये जातात. तिथं निवडून आल्यावर पुन्हा भाजपमध्ये जातात. आता कुठं जाणार माहीत नाही, असा टोला अजित पवार यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता मारला. तसेच माणमधील राजकारण अतिशय खालच्या पद्धतीचे सुरु आहे, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार पुढे म्हणाले, तात्यांनी कायम राष्ट्रवादीसोबत राहुन तालुक्याचा जास्तीतजास्त विकास करण्याचा प्रयत्न केला. राजकारणातील त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त पाझर तलाव त्याकाळी माणमध्ये झाले. तालुक्याचा विकास करण्याची तात्यांची परंपरा कायम सुरू ठेवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती एकहाती मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुट ठेवावी. तसेच येत्या लोकसभेला माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विचाराचाच खासदार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

अजित पवारांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला इशारा

या वेळी बोलत असताना अजित पवार म्हणाले, आमच्याकडे सर्व संस्था होत्या पण कधी आम्ही सत्तेचा माज केला नव्हता. आज जे काही चालेल आहे, अधिकारयांनो कुणाचाही दबावाला बळी पडु नका. कोणाच्याही सत्तेत असणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन त्रास देऊ नका. सत्तेत आम्ही कधी येऊ हे तुम्हाला कळणारही नाही असा इशारा त्यांनी दिला.

    follow whatsapp