१०० कोटींच्या वसुली प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. देशमुख यांच्या काटोल येथील निवासस्थानी आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे.
ADVERTISEMENT
सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीच्या ४-५ अधिकाऱ्यांचं एक पथक देशमुख यांच्या काटोल येथील निवासस्थानाची झाडाझडती घेत आहे. देशमुख कुटुंब हे सध्या घरी नसून बाहेरगावी गेल्याची माहिती कळते आहे. या रेडची माहिती ईडीने स्थानिक पोलिसांनी दिलेली नव्हती. देशमुख यांच्या बंगल्याबाहेर सीआरपीएफचे काही जवान तैनात करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीची ईडीने अनिल देशमुख यांची 4.20 कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात देशमुख यांनी निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझेला देशमुखांनी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा आरोप केला होता. याच प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पैशांच्या व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्यात येत आहे.
माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना ED चा दणका, कोट्यवधींची संपत्ती जप्त
तळोजा कारागृहात कैद असलेल्या सचिन वाझेनेही ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात देशमुख यांचा उल्लेख केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे ईडी आता देशमुखांविरुद्ध कारवाईत पुढचं पाऊल काय उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT