राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून आज अटक करण्यात आली. ज्या पद्धतीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली त्याचा महाविकासआघाडी गुरूवारी निषेध करणार आहे. गुरूवारी सकाळी 10 वाजता महाविकासआघाडीचे नेते मुंबईत आंदोलन करणार आहे. तर परवापासून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करत महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा विरोधी पक्षाचा डाव असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई
छगन भुजबळ म्हणाले, नवाब मलिक हे विरोधकांविरुद्ध बोलतात म्हणून 30 वर्षापूर्वीच्या प्रकरणात मलिकांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. मंत्र्याचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. नवाब मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करत या पद्धतीने कारवाई करणे हे लोकशाहीला शोभा न देणारे हे वागणे आहे. ज्या वेळी हे प्रकरण घडले त्यावेळी पीएमलए कायदा अस्तित्वात नव्हता असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
आणखी काय म्हणले छगन भुजबळ?
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र याविषयी मीडियाशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, ‘नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. नवाब मलिकांची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. 30 वर्षापूर्वीच प्रकरण मुद्दामून उकरुन ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही.’
‘ईडीने फक्त अटक केली म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा घेणं चुकीचं ठरेल आजच्या घडीला. जोवर ते न्यायालयासमोर दोषी ठरत नाही तोवर त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. अटकेचाच निकष लावायचा तर काही दिवसापूर्वी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांचा राजीनामा तेव्हा घेतला होता का?’ असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.
नवाब मलिक काल म्हणालेले, ‘कोणत्या अभिनेत्रीचे कोणासोबत संबंध..’, अन् आज ED ची कारवाई
नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडीत धाडण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्या घरी पहाटे साडेचारलाच ईडीचे अधिकारी गेले होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मेडिकल चाचणी करून त्यांना अटक कऱण्यात आली. कोर्टात ईडीने त्यांची चौदा दिवसांची कोठडी मागितली होती. त्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवादही केला. ईडी आणि नवाब मलिक यांचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
ADVERTISEMENT