मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. आज सकाळी साडेनऊ वाजता मुंबई विमानतळावरून CM शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आजी-माजी आमदार, खासदार त्यांचे कुटुंबिय असे जवळपास 178 सदस्य विषेश विमानाने गुवाहटीला रवाना होणार आहेत. गुवाहाटी विमानतळावर दुपारी 12 वाजतच्या दरम्यान त्यांचे आगमन होईल.
ADVERTISEMENT
गुवाहटीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर सर्वजण सत्तांतर नाट्यावेळी प्रसिद्ध झालेल्या ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलवर मुक्काम करणार आहेत. उद्या सकाळी शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला परतणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.
जून महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान गुवाहटीहून परत येताना शिंदेंसह सर्वांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर शिंदे आणि सहाकाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री, मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता बंड यशस्वी झाल्याचा दावा करत एकनाथ शिंदे आणि सहकारी पुन्हा एकदा गुवाहटीला जाऊन कामाख्या देवीचा आशीर्वाद घेणार आहेत.
शिंदे गट – अपक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध
दरम्यान, महाराष्ट्रात परत येताच मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पार पडण्याची शक्यता आहे. 30 जून रोजी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा छोटेखानी विस्तार करण्यात आला होता.
त्यानंतरच्या विस्तारासाठी सातत्याने नव-नव्या तारखा समोर येत होत्या. मात्र या तारखा केवळ अफवाच असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर आता नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. डिसेंबर महिन्यात अधिवेशन असल्याने शिंदे गट गुवाहटीहून परतल्यानंतर आठवड्याभरातच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
गत विस्तारात इच्छुक असलेल्या अनेकांचा पत्ता कट झाला होता. शिंदे गटातील अनेक जण मंत्रिमंडळात संधी मिळणार, यामुळे आनंदात होते. मात्र, ऐनवेळी त्यांना बाहेरच राहावं लागलं. दुसरीकडे शिंदे गटासोबत गेलेल्या अपक्षांनाही मंत्रिपदाची आस होती. पण, भाजप आणि शिंदे गटाने अपक्षांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासह काहींनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे.
ADVERTISEMENT