राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
ADVERTISEMENT
आपल्यासोबत जे आले आहेत ती म्हणजे सत्तेसोबत आलेली सूज आहे. निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. आपल्यासोबत कुणीही आलेलं नाही हे एकनाथ शिंदे यांना कळून चुकलं आहे. त्यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्वव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिली आहे.
काय म्हटलं आहे भास्कर जाधव यांनी?
आपल्या बरोबर आलेले लोक म्हणजे सत्तोसोबत आलेली सूज आहे. परंतु जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते जागेवरच आहेत हे कळल्यामुळेच आणि मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे सरकारवर केली आहे, रत्नागिरीत भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे.
४० आमदारांनी विश्वासघात केला
भास्कर जाधव म्हणाले की, ज्या ४० आमदारांनी विश्वासघात करून उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं, त्या ४० आमदारांच्या मतदारसंघात आमचे नेते आदित्य ठाकरे गेले त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला आलेले लोक आणि बीकेसीवर आणलेले लोक यातला फरक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. एवढंच काय आमच्या महाप्रबोधन यात्रेलाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
निष्ठावान कोण आहे ते एकनाथ शिंदेंना समजलं आहे
आम्हाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांना कळून चुकलं आहे की आपल्याबरोबर कोणीही आलेलं नाही, आपल्या बरोबर आलेली आहे ती सत्तेबरोबर आलेली सूज आहे, परंतु जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते जागेवरच आहेत, हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे, त्यामुळे आम्हाला थांबविण्यासाठी आमच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे. त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची मी फार काही दखल घेत नाहीत असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचं विभाजन
२१ जूनला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. कारण शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यांना साथ लाभली ती ४० आमदारांची. त्यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. एवढंच नाही तर शिवसेनेचंही विभाजन झालं. शिवसेनेचं मूळ शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT