काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत! सोनिया गांधींनी ५ जणांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

मुंबई तक

• 10:52 AM • 17 Mar 2022

१० मार्च रोजी लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जी २३ नेत्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या धोरणांबद्दल पुन्हा एकदा टीकेचा सूर लावला आहे. अशातच उत्तर प्रदेशसह पाच राज्यात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच नेत्यांवर यासंदर्भातील जबाबादारी सोपवली आहे. देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसला पराभवाला […]

Mumbaitak
follow google news

१० मार्च रोजी लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जी २३ नेत्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या धोरणांबद्दल पुन्हा एकदा टीकेचा सूर लावला आहे. अशातच उत्तर प्रदेशसह पाच राज्यात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच नेत्यांवर यासंदर्भातील जबाबादारी सोपवली आहे.

हे वाचलं का?

देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला, तर पंजाबमध्ये सत्ता गमवावी लागली. महत्त्वाचं म्हणजे अवघ्या २० च्या आतच जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. मणिपूर, उत्तराखंडमध्येही काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली नाही.

काँग्रेसला सातत्याने निवडणुकीत अपयश येत असल्यानं या निकालानंतर काँग्रेसमधील एक गट आता थेट काँग्रेस नेतृत्वाशी भिडताना दिसत आहे. दरम्यान, पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर सोनिया गांधी यांनी संघटनात्मक बदलांचे संकेत दिले आहेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या निवडणुका पार पडलेल्या राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन संघटनात्मक बदलांसंदर्भात सूचना करण्यासाठी पाच नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. यात महाराष्ट्रातील एका महिला नेत्याचा समावेश आहे.

जयराम रमेश यांच्यावर मणिपूर, अजय माकन यांच्यावर पंजाबमधील सद्यस्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजीव सातव यांच्या जागेवरून राज्यसभेत निवडून गेलेल्या रजनी पाटील यांच्यावर गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जितेंद्र सिंह यांच्यावर उत्तर प्रदेश, तर अविनाश पांडे यांच्यावर उत्तरांखडमधील निवडणुकीनंतरच्या स्थितीचा आढावा घेऊन संघटनात्मक बदल करण्यासंदर्भात शिफारशी करण्याचे आदेश गेले आहेत.

केसी वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आणि संबंधित राज्यातील नेत्यांसह संघटनात्मक बदलासंदर्भात सल्ला देण्याबद्दलचा सल्ला द्यावा, असे आदेश नेत्यांना दिले गेले आहेत.

उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, गोवा, पंजाबमध्ये मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसची बैठक पार पडली होती. त्यानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांना राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पंजाबमधील नवज्योत सिद्धूंसह प्रदेशांनी राजीनामे सोपवले आहेत.

    follow whatsapp