पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे. पण मलिकांवर अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली आहे. असं म्हणत आपण त्यांचा राजीनामा घेणार नाही असंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
पाहा नवाब मलिकांबाबत पवार नेमकं काय म्हणाले:
‘मलिक मुस्लिम असल्याने त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जातोय’
‘मला असं वाटतं की, नवाब मलिक यांना अटक केली त्यानंतर आमचं स्वच्छ मत आहे की, त्यांना राजकीय हेतूने अटक केलेली आहे. गेली 20 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सगळ्या काळात हे चित्र कधी दिसलं नाही. ते आत्ताचं दिसू लागलं आहे.’
‘आणखी एक गोष्ट अशी आहे की, एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की, त्याचा संबंध दाऊदशी जोडला जातो. एका दृष्टीने काही कारण नसताना हा आरोप केला जात आहे. खरं म्हणजे मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावर देखील असे आरोप झाले होते.’ असं म्हणत पवारांनी भाजपवरच निशाणा साधला.
‘मलिकांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न, पण आम्ही संघर्ष करु’
‘नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे जाणूनबुजून केलं जात आहे. पण यासोबत आम्ही संघर्ष करु.’ असंही पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
उद्घाटनांपेक्षा विद्यार्थ्यांची सुटका होणं गरजेचं, शरद पवारांचा PM मोदींना जोरदार टोला
‘राणेंना पण अटक झालेली, त्यांचा राजीनामा घेतला का?’
‘नवाब मलिकांचा राजीनामा घ्या असं ते का म्हणतात? कारण त्यांना अटक केली आहे. कबूल आहे.. मला काळजी एकच आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे एक जुने सहकारी जे आहेत, राणे साहेब… त्यांनाही अटक केल्याचं वाचलं होतं. तुमच्या कोणाच्या वाचनात आलं की नाही माहित नाही. त्यांनाही अटक केली होती. त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कोणी घेतला असं काही माझ्या पाहण्यात अद्याप आलेला नाही.’
‘उद्या पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत कदाचित ते याचा खुलासा करतील. पण एक न्याय तुम्ही नारायण राणेंना लावता दुसरा न्याय तुम्ही आज याठिकाणी नवाब मलिकांना लावता. याचा अर्थ राजकीय सूडबुद्धीने मलिकांना अटक करण्यात आली आहे.’ असं म्हणत पवारांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
ADVERTISEMENT