मुंबई : पुरंदरचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवतारे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे. त्यामुळे आता शिवतारे देखील दीपक केसरकर यांच्याप्रमाणे पक्षाची बाजू मांडताना दिसून येणार आहेत. यातून शिवतारे यांना ताकद देण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेतील फुटीपूर्वी विजय शिवतारे पुणे जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख नेते होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवतारे यांनीही बंडाचं निशाण हाती घेतलं. महाविकास आघाडीमध्ये असताना पुरंदर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्याशी त्यांचं सख्य जमू शकलं नव्हतं. अनेकदा दोघांमध्ये जाहीर शाब्दिक वाद झाले होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करताना दिसून येत होतं.
अशातच शिवतारे यांचं शेजारील बारामतीमधील पवार कुटुंबियांशी देखील विळ्या-भोपळ्याचं नातं तयार झालं होतं. २०१९ मध्ये अजित पवार यांनी जाहीर सभेत आव्हान देत शिवतारे यांचा पराभव करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांचा पराभवही झाला. पुढे अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही मतदारसंघामध्ये शिवसेनेचं खच्चीकरण होतं असल्याचा आरोप शिवतारे करत होते.
शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवतारे यांनी त्यांची साथ दिली. त्यामुळे त्यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केली होती. शिवतारे यांची हकालपट्टीबद्दलची माहिती शिवसेनेच्या ‘सामना’या मुखपत्रातून जाहीर करण्यात आली होती. या हकालपट्टीनंतर पुण्यात शिवतारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे असं सांगितलं होतं.
ADVERTISEMENT