कोरोनाच्या काळात माणुसकी हरवत चालली आहे का? असा प्रश्न पडावा अशी काही उदाहरणं समोर येत आहेत. अशात आदर्शवत म्हणावं असं पाऊल पुण्यातील दोन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 100 बेड्सचं कोव्हिड ऑक्सिजन हॉस्पिटल सुरू केलं आहे. नूतन महाविद्यालय आणि भावे मराठी शाळेच्या 1992 आणि 1994 च्या बॅचच्या 200 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हे वेगळं पाऊल उचललं आहे. आदर्शवत असं म्हणावं असंच हे पाऊल आहे.
ADVERTISEMENT
100 बेड्सचं कोव्हिड ऑक्सिजन रुग्णालय उभारण्या मागची संकल्पना काय हे विचारल्यानंतर या माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं महिनाभर आधी या काही विद्यार्थ्यांच्या जवळच्या लोकांना, जे कोरोना व्हायरस महामारी ग्रस्त होते त्यांना ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी खूप त्रास झाला त्यावेळेस या मित्रांना वाटले की आपण एकत्रित येऊन पुणे महानगरपालिका आणि काही सामाजिक संस्थेच्या मदतीने असं कोविड ऑक्सिजन बेड्स रुग्णालय सुरु केले पाहिजे. जेणकरून अनेकाना हे बेड मिळवण्यात जशी अडचण येते आहे ती येऊ नये म्हणून आम्ही हे रूग्णालय सुरू केलं असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.
या सगळ्या 200 विद्यार्थ्यांनी जसे जमेल तसे पैसे देऊन आणि त्यांच्या कॉन्टेक्ट्स कडून डोनेशन मिळवून , 15 दिवसात हॉस्पिटल उभे केलं आहे. महापालिकेने गणेश क्रीडा संकुलाची जागा औषधं आणि ऑक्सिजनची मोठी जबाबदारी पार पाडली आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. या कोव्हिड रूग्णालयात कोरोना रूग्णही येऊ लागले आहेत.
नूतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काय म्हटलं आहे?
शाळेत असताना ती 10 वर्षे आम्ही खूप धमाल केली आहे. ती धमाल, मस्ती शाळेपुरती मर्यादित न राहता फेसबुक आणि Whats App यामुळे वाढीला लागली. मात्र आत्ताचा उद्देश जरासा वेगळा आपण ज्या ठिकाणी वाढलो लहानाचे मोठे झालो त्याठिकाणी त्या समाजाचे ऋण फेडले पाहिजेच. कारण शिक्षणाचा वापर करून आपण आज काहीतरी स्थान समाजात प्राप्त केले आहे त्या शिक्षणापासून कोणीही गरीब वंचित राहायला नको हीच भावना, ते करताना मग अजून सामाजिक कार्य करण्याची कल्पना मनात आणली रुजली आणि आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य आहेच ‘हाती घ्याल ते तडीस न्याल’ यानुसार कार्य जोमाने चालू आहेच निश्चितच त्याला समाजातील सर्व घटक, मित्र मंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक यांची भरभक्कम साथ आहे म्हणूनच.
आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा.
सर्वात प्रथम शाळेतील गरजू आणि होतकरू विध्यार्थी जे आहेत ज्यांच्याकडे शाळेची फी भरायला पैसे नाहीत त्या मुलांची फी डायरेक्ट बँकेत जाऊन जमा केली, तसेच दरवर्षी शाळेत रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. दोन वर्षांपूर्वी सांगली येथे झालेल्या पुरात अनेक जणांचे संसार उध्दवस्त झाले तेथील विद्यार्थ्यांना शालेय किट, कपडे, किराणा माल देणे.
तसंच गेल्यावर्षी निसर्ग वादळ झालं तेव्हा कोकणात जाऊन जागेवर तेथील लोकांना किराणा सामान, ताडपत्री, गाद्या उश्या, इत्यादी सामान पोचवले. वृद्धाश्रमातील मोडकळीस आलेल्या वस्तू नवीन देणे. तसेच गेल्या वर्षी कोविड मुळे बरेच लोक नोकरी गमावून बसले होते त्यांना किराणा माल देणे, पोलीस चौकी मध्ये हँड ग्लोज, सॅनिटीझर, मास्क, PPE किट देणे इत्यादी. या वर्षी पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला तेव्हा काळाची गरज ओळखून चर्चा करण्यात आली तेव्हा आपला मित्र डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांचे कडून कळले की ते कोव्हिड सेंटर उभे करत आहेत. पुन्हा चर्चा केली सर्वजण जोमाने कामाला लागले सर्वांना मदतीचे आवाहन करण्यात आले हा हा म्हणता मदतीचा ओघ अखंडपणे सुरू झाला अजूनही चालूच आहे.
ADVERTISEMENT