कल्याण : गोव्यात मिळणारी स्वस्त दारू ठाणे जिल्ह्यात आणून विक्री करण्याचा डाव शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने दारूचा साठा, दोन आलिशान वाहनांसह सुमारे पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नामांकित हॉटेल्समध्ये गोवा बनावटीच्या दारूचा पुरवठा अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातून होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट असून त्याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
कल्याण जवळील मलंगगड भागात गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी येत आहे. विशेष म्हणजे डोंबिवली परिसरात निर्माण झालेल्या मोठंमोठ्या हॉटेल्समध्ये गोवा बनावटीच्या दारूची मागणी होत आहे. त्यामुळे गोवा बनावटीच्या दारूचा मलंगगड भागातून पुरवठा होत असल्याचं समोर आलं आहे.
मलंगगडच्या कुंभार्ली गावात असलेल्या शिव आरती बंगल्याच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये असलेला गोवा बनावटीचा दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागीय पथकाने जप्त केला आहे.
या प्रकरणी कल्याणच्या काटई गावात राहणाऱ्या वासुदेव किसन चौधरी याच्यासह नेवाळीमध्ये राहणाऱ्या रंजन शेट्टी आणि गुलाब अहमद राजा या तिघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून गोवा बनावटीची पन्नास लाखांची नामांकित कंपन्यांची दारू जप्त करण्यात आली आहे. तर दारू विकत घेणारे तिघे ग्राहक देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात आणखी काही बडे मासे हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या सर्व आरोपीना न्यायालयाने चार दिवसांची एक्सईझ कस्टडी सुनावली आहे. गेल्या काही दिसवांपासून मलंगगड भागात गोवा बनावटीच्या दारूचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी देखील आठ लाखांची गोवा बनावटीची दारू ताब्यात घेत पाच जणांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत पन्नास लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक, राज्य उत्पादन एन.एन.मोरे,दुय्यम निरीक्षक जी.एच.पाटील, आर.एस.राणे, दुय्यम निरीक्षक, अंबरनाथ विभागाचे निरीक्षक घुले,आर.के.शिरसाट,निरीक्षक,डोंबिवली विभागाचे निरीक्षक श्री. पवार यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.
गोवा बनावटीची दारूचा थेट ग्रामीण भागातून शहरी भागातून पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे .एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असताना स्थानिक पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याने आचार्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात आणखी काही बडे मासे गळाला लागतात का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT