– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी
ADVERTISEMENT
राज्यातल्या शेतकऱ्याने आतापर्यंत अनेकप्रकारच्या नैसर्गिक संकटाला तोंड दिलं आहे. अनेकदा खडतर परिस्थितीवर मात करत शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे आणि त्याने स्वतःला पुन्हा सिद्ध केलं आहे. वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने संकटापुढे हार न मानता झुंज देण्याच्या महाराष्ट्राच्या स्वभावाचं मूर्तीमंत उदाहरण घालून दिलं आहे. शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडीची कमतरता असल्यामुळे वाशिममधील शेतकरी भाऊराव धनगर यांनी चक्क घोड्यांना औताला जुंपलं आहे.
भाऊराव धनगर यांनी केलेला हा प्रयोग सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय. बैलजोडी नसल्यामुळे भाऊराव यांनी ट्रॅक्टरने शेती नांगरायचा विचार केला. परंतू ट्रॅक्टरचे वाढलेले दर पाहून हा खर्च आपल्या अवाक्याबाहेरचा असल्याचं त्यांना लक्षात आलं. अशावेळी हौस म्हणून पाळलेल्या घोड्यांनाच भाऊराव यांनी शेतीच्या कामाला जुंपलं. इतकच नव्हे तर शेतातल्या किरकोळ सामानाची ने-आण देखील भाऊराव आता या घोडागाडीतूनच करत आहेत.
राजा आणि तुळशीराम अशी भाऊराव यांच्या दोन घोड्यांची नावं आहेत. भाऊराव यांनी औताला जुंपण्याआधी या घोड्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांचं शेतातलं मशागतीचं कामही जलद गतीने व्हायला लागलं. घोडा हा प्राणी जेवढा कामात सक्रीय राहील तितकं त्याचं आरोग्य चांगलं राहतं असं ग्रामीण भागात बोललं जातं. तसेच राज्यात डोंगराळ भागात होणाऱ्या शेतीतही सामानाची ने-आण करण्यासाठी घोडे आणि खेचरांचा वापर होतो. यावरुनच भाऊराव यांना शेतीसाठी घोडे वापरायची कल्पना सुचली.
राज्यात सध्या आधुनिक शेतीचे वारे वाहत आहेत. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शेती करण्याचा सल्ला दिला जातो. परंतू ज्या शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता उपलब्ध परिस्थितीत कसं काम करायचं याचं मूर्तीमंत उहादरण भाऊराव धनगर यांनी घालून दिलंय. ज्यासाठी त्यांचं राज्यभरात कौतुक होताना दिसतंय.
ADVERTISEMENT