देशभरातील टोल नाक्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टॅगची संकल्पना आणली होती. केंद्र सरकारने देशातील सर्व वाहनधारकांना फास्ट टॅग लावून घेण्याचे आदेश दिले होते. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत फास्ट टॅग सर्व वाहनधारकांना लावून घ्यावाच लागेल. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागेल असेही आदेश सरकारने दिले आहेत.
ADVERTISEMENT
देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्ट टॅगची सोय उपलब्ध आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने फास्ट टॅग लावून घेण्यासाठी दोन-तीनवेळा मुदतवाढ दिली होती, पण आता ही मुदतवाढ मिळणार नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं.
फास्ट टॅग म्हणजे काय?
फास्ट टॅग हा एका प्रकारचा डिजीटल स्टिकर आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच RFID या अद्ययावत यंत्रणेवर हे स्टिकर काम करतं.
रोख पैशांचे व्यवहार न करण्यासाठी ही यंत्रणा केंद्र सरकारने सुरु केली आहे.
सध्या देशातील टोलनाक्यांवर रोख पैसे किंवा कॅशलेसच्या माध्यमांतूनही टोल भरता येतो.
पण केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार ज्या वाहन धारकांनी फास्ट टॅग लावला आहे त्यांना टोल नाक्यावर थांबून राहण्याची गरज लागणार नाहीये. या व्यक्तीच्या टोलची रक्कम ही त्या टॅगशी जोडल्या गेलेल्या प्री-पेड अकाऊंट किंवा बँक अकाऊंटमधून कापली जाणार आहे.
टोलनाक्यांवर होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतुककोंडी हा सर्व महत्वाच्या शहरांमध्ये चर्चेचा मुद्दा होता. या गर्दीवर उपाय काढण्यासाठी फास्ट टॅगची संकल्पना राबवण्यात येत आहे. याचसाठी राष्ट्रीय महामार्गावरील सर्व लेन्स या केंद्र सरकारने फास्ट टॅग करण्याचं ठरवलं आहे.
ADVERTISEMENT