सांगली: महाराष्ट्र मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि पुराच्या संकटाच्या सामना करत आहे. सुरुवातीला कोकण किनारपट्टीला आपला तडाखा देणाऱ्या पावसाने नंतर आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला. येथील अनेक जिल्ह्यांमध्ये एवढा पाऊस बरसला की, त्याने अवघ्या काही तासांमध्ये पुराची स्थिती निर्माण केली. सुरुवातीला कोकणातील चिपळूणला पुराचा तडाखा बसला. येथील पुराचं पाणी ओसरतं नं ओसरतं तोच कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पुराची परिस्थिती निर्माण झाली. येथील पुराचं पाणी अद्यापही कमी झालेलं नाही. असं असताना आता सांगली जिल्ह्यात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
सांगलीतील कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही सातत्याने वाढत असल्याने अनेक भागात पुराचं पाणी शिरलं आहे. संततधार पावसामुळे सांगलीतील दुकाने, घरं तसंच पोलिस स्टेशन देखील पाण्यात बुडालं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच मागील तीन दिवसांपासून येथील अनेक भागातील पाणी अजिबात कमी झालेलं नाही.
सांगली शहरातील 40 हून अधिक ठिकाणामध्ये आतापर्यंत पुराचं पाणी घुसलं आहे. कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे सांगली शहर आता रेड झोनमध्ये दाखल झालं आहे.
एखाद्या भागात 40 फुटापर्यंत पाणी असल्यास तिथे येलो (Yellow)अलर्ट जारी केला जातो. जर पाण्याची पातळी 50 फुटापर्यंत पोहचली तर तिथे ऑरेंज (Orange) अलर्ट दिला जातो आणि पुराच्या पाण्याची पातळी ही 50 फुटांहून अधिक असेल तर तिथे रेड (Red) अलर्ट जारी केला जातो. त्यामुळेच आता सांगलीमध्ये सध्या रेड अलर्ट जारी केला गेला आहे.
सांगलीमधील पुराची भीषण स्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि लष्कराच्या काही तुकड्या दाखल झाल्या असून ते अथकपणे बचाव कार्य करत आहेत.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती किती भयंकर आहे याचा अदांज हा आपल्याला पुढील काही आकडेवारीवरुन समजू शकेल.
मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील आतापर्यंत 22 हजार कुटुंबातील तब्बल 1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. तर 24 हजाराहून अधिक जनावरं देखील अन्य ठिकाणी हलविण्यात आली आहेत.
Sangli रेड झोनमध्ये, कृष्णा नदीची पातळी तब्बल 54 फुटांच्याही वर
सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे तब्बल 94 गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यात 13 जनावरांची आणि 17 हजार 300 कोंबड्यांची जीवितहानी झाली आहे. तर सांगली 60 टक्के जलमय झाली आहे.
ADVERTISEMENT