अहमदनगर: माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि अहमदनगरमधील भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज (17 मार्च) पहाटे निधन झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, कालच (16 मार्च) त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे त्यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज पहाटे त्यांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 69 वर्ष होतं.
दिलीप गांधी हे आपल्या काही खासगी कामानिमित्त दिल्लीला गेले होते. पण दिल्लीला गेल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचं कालच समोर आलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
Exclusive : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही – डॉ. रमण गंगाखेडकर
दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण कालपासूनच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि मुलगी असा परिवार आहे.
Corona चा महाराष्ट्रात कहर सुरूच ! दिवसभरात १७ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
दिलीप गांधी यांची राजकीय कारकीर्द:
-
दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते.
-
भाजप सरकारमध्ये 2003 ते 2004 दरम्यान दिलीप गांधी हे केंद्रात राज्यमंत्री देखील होते.
-
दिलीप गांधी हे 1999 साली ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 आणि 2014 साली देखील त्यांना खासदार म्हणून नगरकरांनी पसंती दिली होती.
-
दरम्यान, 2019 साली भाजपने सुजय विखे यांना पक्षात घेऊन त्यांना अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली. त्यावेळी दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यानंतर गेल्या वर्षभरापासून ते सक्रीय राजकारणातून बाजूला पडले होते.
-
सुरुवातीला खासदारकी नाकारल्याने त्यांनी पक्षाकडे नाराजी देखील व्यक्त केली होती. सुजय विखे यांच्या जाहीर सभेत त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून देखील आली होती. मात्र राज्यातील नेतृत्वाने त्यांना पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर ते पुन्हा एकदा भाजपमध्ये सक्रीय झाले होते.
ADVERTISEMENT