बहुचर्चित शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. ३० जूनला राज्यात नवं सरकार स्थापन झालं. ज्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ३० जून ते ८ ऑगस्ट या संपूर्ण कालावधीत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं सांगितलं जात होतं. अखेर आज हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. पण, मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेचा समावेश नसल्यानं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाल्या आहेत किशोरी पेडणेकर?
या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या नऊ आणि शिंदे गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये एकही महिला नाही. यावरूनच किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. बोल गया सबकुछ लेकिन याद नहीं अब कुछ अशी या सरकारची परिस्थिती आहे. आम्ही किती संवेदनशील आहोत असं चित्र या सरकारने निर्माण केलं. मात्र हा भोपळा फुटला आहे.
एका महिलेने ज्या व्यक्तीमुळे आत्महत्या केली त्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. तसंच यांच्या पक्षात दोन-तीन महिला उरल्या आहे त्यापैकी मंत्रिपदासाठी एकही लायक नाही का? असा खोचक प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
भाजपला उद्देशून काय टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता त्याच संजय राठोड यांना पुन्हा मंत्री करण्यात आलं आहे. त्यावेळी भाजपने रान उठवलं होतं. चित्रा वाघ यांनी तर आकाश-पाताळ एक केलं होतं. आता संजय राठोड यांना मंत्री करण्यात आलं आहे. त्यामुळे तेव्हा बोलणारे पोपट आता कुठे गेले असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपवर टीका केली होती.
ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे? किशोरी पेडणेकर यांचा सवाल
शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आम्ही काळजीपूर्वक पाहिला. यावेळी कुणीही बाळासाहेब ठाकरे किंवा स्वतःच्या आईचं नाव घेतलं नाही. मागच्या वेळी शपथ घेताना कुणी आपल्या आईचं ना घेतलं होतं. मात्र यावेळी तसं काहीही घडलं नाही. एवढंच काय कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचंही नाव घेतलं नाही. ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे? असाही प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी विचारला.
ADVERTISEMENT