मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये आता गुन्हा दाखल झाला असून ते प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. परमबीर सिंह यांच्यासह डीसीपी पराग मणेरे, बिल्डर संजय पुनमिया, व्यापारी सुनील जैन आणि एक मनोज घाटकर यांच्यासह तीन अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
तसेच या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID)कडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला एफआयआर देखील तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे.
नेमकं प्रकरण काय?
परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पराग मणेरे हे ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. यानंतर परमबीर सिंग यांची मुंबईत बदली झाल्यानंतर पराग मणेरे यांनाही मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बढती देण्यात आली होती. पुनामिया आणि जैन यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याआधीच अटक केली आहे.
शरद अग्रवाल या व्यक्तीने ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आणि इतरांवर गुन्हा दाखल केला होता. शरद अग्रवाल हा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेले बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या आहे. शरद अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्रवाल यांच्याकडून 2 कोटी रुपये वसूल करत एका जमिनीच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करायला लावली होती. परमबीर सिंग ठाणे पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांच्या बंगल्यावर हा प्रकार घडल्याचं शरद अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.
सुरुवातीला या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता हे प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंग यांच्या निलंबनाची शिफारस
महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी माजी आयुक्त परमबीर सिंह आणि इतर 25 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच एसीबी त्याच्याविरुद्ध दोन प्रकरणांमध्ये तपास करत आहे.
डीजीपी संजय पांडेय यांनी पाठवलेल्या प्रस्तावासहीत परमबीर सिंग यांच्यासहीत ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत हे अधिकारी डीसीपी, एसीपी या दर्जाचे आहेत. तसंच इतरही काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीजीपींद्वारे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जो सरकारने परत पाठवला आहे आणि ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी होते आहे त्यामागचं कारण स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.
Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ, आणखी एक गुन्हा दाखल
परमबीर सिंह 4 मे पासून रजेवर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंग हे 4 मे पासून प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देत रजेवर आहेत. त्यांनी 29 ऑगस्टनंतर सुट्टी दोनदा सुट्टी वाढवून घेतली आहे. तथापि, नंतर त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही किंवा ते ड्युटीवर परतलेले नाहीत.
ADVERTISEMENT