मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गणरायाचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थ या ठिकाणी पोहचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने होत असली तरीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट का महत्त्वाची मानली जाते आहे ?
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी गणपतीच्या निमित्ताने भेट घेतली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. या सगळ्या गोष्टी २१ जूननंतर घडल्या आहेत. अशात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती राज ठाकरेंची. कारण मनसे आणि भाजप यांच्यात युती होईल अशाही चर्चा रंगल्या आहेत.
या सगळ्यात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. या दोघांमध्ये राजकीय चर्चा तर होणारच आहे. राज ठाकरे हे मनसेच्या स्थापनेआधी शिवसेनेतच होते. तसंच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मीच चालवतो आहे. वैचारिक वारसा माझ्याकडेच आहे असंही राज ठाकरेंनी नुकतंच सांगितलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्हीच पुढे नेत आहोत. आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली आहे. शिवसेना दुभंगली आहे.
शिवसेनेची स्पेस राज ठाकरे घेणार का?
शिवसेनेत दोन गट पडल्याने तसंच उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका झाली. तसंच शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे जी स्पेस निर्माण झाली. ती स्पेस भरून काढण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. अशात एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला मेळावा घेतला. त्यानंतर ज्या उत्तर सभा आणि इतर सभा घेतल्या त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने पुढे आणला. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
ADVERTISEMENT