मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला अखेर भारतात आणण्यात आलं आहे. त्याला फिलिपाइन्समध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू होती. मंगळवारी रात्री उशिरा अटक करुन सुरेश पुजारीला दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं. सुरेश पुजारी हा पूर्वी डॉन रवी पुजारीसोबत काम करायचा. दरम्यान, आरोपी सुरेश पुजारी याला आज ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्याला 25 डिसेंबरपर्यंत म्हणजेच 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.Suresh Pujari: भारतात परत आणलं अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला, ‘या’ देशात बसला होता लपून
ADVERTISEMENT
डॉन सुरेश पुजारी याला फिलिपाइन्समध्ये एका इमारतीबाहेर उभा असताना त्याला अटक करण्यात आली. अटकेवेळी मुंबई पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्याला 15 ऑक्टोबर रोजी डोना अवे नावाच्या महिलेसह पकडण्यात आले होते. मुंबई पोलीस, सीबीआय व्यतिरिक्त तो एफबीआयच्याही रडारवर होता. एफबीआयने 21 सप्टेंबर रोजी सुरेश पुजारीबद्दल महत्त्वाची माहिती शेअर केली होती.
रवी पुजारीसोबत काम करायचा सुरेश
सुरेश पुजारी पूर्वी डॉन रवी पुजारीसोबत काम करायचा. सुमारे 10 वर्षांपूर्वी त्याने रवी पुजारीपासून वेगळे होऊन त्याने स्वत:ची टोळी बनवली होती. खंडणीसाठी तो स्वत: नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातील डान्सबार मालकांना नियमित फोन करत असे. जो डान्स बार मालक त्याला खंडणी देत नसे त्यांच्यावर तो गोळीबार घडवून आणायचा.
2018 साली त्याच्या शूटर्सने कल्याण-भिवंडी महामार्गावरील केएन पार्क हॉटेलवर गोळीबार केला होता. त्यावेळी रिसेप्शनवर बसलेल्या एका कर्मचाऱ्यालाही गोळी लागली होती.
गोळीबारानंतर मागितली होती खंडणी
गोळीबार केल्यानंतर सुरेश पुजारी याने पुन्हा या हॉटेलच्या मालकाला फोन करून 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याच केसमध्ये मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय सावंत आणि सचिन कदम यांनी सुरेश पुजारी टोळीतील सुमारे अर्धा डझन गुंडांना अटक केली होती. त्यानंतरही सुरेश पुजारीच्या अनेक गुंडांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्या गुंडांच्या मदतीने सुरेश पुजारी नेमका कुठे आहे हे शोधण्याचा मुंबई पोलीस प्रयत्न करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2016 मध्ये इंटरपोलने त्याच्याविरुद्ध पहिली रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. दरम्यान, एफबीआयनेही त्याच्याबाबत ठोस माहिती दिली आहे.
2016 पासून फिलीपिन्समध्ये राहत होता सुरेश पुजारी
सुरेश पुजारी हा 21 सप्टेंबर रोजी फिलीपिन्समध्ये असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. परंतु खरं तर तो 2016 पासूनच तिथे राहत होता. त्याच्या भारतीय पासपोर्टची मुदत 2019 मध्ये संपली. त्याच्या विरोधात 2 जुलै 2016 आणि 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबईतील दोन वेगवेगळ्या न्यायालयांनी दोन वॉरंट जारी केले होते. सुरेश पुजारी हा मूळचा उल्हासनगरचा आहे. 2007 मध्ये तो भारतातून पळून गेला होता. सुरेश पुजारी व्यतिरिक्त तो सुरेश पुरी आणि सतीश पै या नावाने वेगवेगळ्या देशात राहत होता.
महेश भट्टच्या ऑफिसबाहेरही घडवून आणला होता गोळीबार
क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2006 मध्ये चित्रपट निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाला होता. तो गोळीबार रवी पुजारीने केला असला तरी त्याचा नियोजक सुरेश पुजारी होता. श्रीपाद काळे हे त्यावेळी घाटकोपर गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यावेळी घाटकोपरच्या असल्फा येथून काळे यांनी सुमारे अर्धा डझन लोकांना पकडले होते. हे सर्व गुंड सुरेश पुजारीचेच होते. तेव्हापासून सुरेश पुजारी फरार झाला होता.
इतर तीन गोळीबारात होता सामील
सुरेश पुजारीचे नाव नवी मुंबई, नाशिक आणि अंबोली येथील तीन शूटआऊटमध्ये देखील समोर आले. रवी पुजारीच्या सांगण्यावरून सुरेश पुजारीने या शूटर्सना सुपारी दिली होती. मात्र, त्यावेळी तो स्वत: भारतात नव्हता त्या तीन प्रकरणांची उकल मुंबई गुन्हे शाखेने केली. नाशिक, आंबोली प्रकरणांचे तपास अधिकारी निगडे हे होते. त्यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये ते कार्यरत होते. नंतर रवी पुजारी आणि सुरेश पुजारी हे एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर सुरेश पुजारीने स्वत:ची टोळी तयार केली.
सुमारे दोन वर्षांपूर्वी रवी पुजारीला भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने देशातील विविध तपास यंत्रणांना सुरेश पुजारीच्या संभाव्य ठावठिकाणाबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. ही सर्व माहिती इंटरपोलला वेळोवेळी अपडेट करण्यात आली. यामध्ये त्याचे फिलिपाइन्सचे ठिकाण शोधण्यात आले आणि अखेर आता त्याला अटक झाली.
छोटा राजन अजुनही जिवंत ! एम्सच्या डॉक्टरांनी मृत्यूची बातमी फेटाळली
डान्सबारमधून होत होती लाखो रुपयांची कमाई
सुरेश पुजारी याच्या वडिलांचे घर असल्फा येथे होते. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरेश पुजारी याची कलिना येथेही काही मालमत्ता होती. तसेच त्याने अंबरनाथमध्ये व्हिडिओ गेम क्लबही उघडला होता. तो ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील अनेक डान्सबारमध्ये बार गर्ल्स पुरवायचा. त्याला प्रत्येक मुलीमागे दररोज हजारो रुपये मिळत असे. या बार गर्ल्सच्या माध्यमातून तो महिन्याला लाखो रुपयांची कमाई करायचा.
सुरेश पुजारी याने कल्याणमध्ये एका केबल ऑपरेटरचा खून केला होता. तसेच त्याने अनेक राजकारण्यांना धमकीचे फोनही केले होते आणि त्याचे ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रवी पुजारीप्रमाणे सुरेश पुजारीही इराणच्या सिमकार्डवरून बहुतांश लोकांना धमकावत असे. मात्र, तो कधीच इराणमध्ये राहिला नाही.
ADVERTISEMENT