– समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
ADVERTISEMENT
प्लास्टिकचा रोजच्या जिवनातला वाढता वापर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं विघटन कसं करायचं हा सध्या सर्व प्रमुख शहरांसमोरचा प्रश्न निर्माण आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद यासारख्या महत्वाच्या शहरांत आजही प्लास्टिकच्या कचऱ्यावरुन निर्माण होणाऱ्या समस्या आपण वाचत असतो. अनेकदा या प्रश्नावर उपाय काढण्याचे प्रयत्नही झाले परंतू त्यांना ठोस यश आलेलं नाही. अनेकदा जनजागृती केल्यानंतरही नागरिक रस्त्यावर प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या फेकून देतात, ज्यामुळे हा कचरा अजुनच साठून जातो.
परंतू पिंपरी-चिंचवड महापालिकेने या समस्येवर आता एक नामी शक्कल लढवली आहे. या योजनेत महापालिका रस्त्यावरील वडापावच्या गाडीवाल्यांची मदत घेणार असून नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या मोकळ्या बाटल्या जमा केल्यानंतर त्यांना एक वडापाव आणि चहा दिला जाणार आहे.
एक वडापाव १५ रुपये आणि एक चहा पाच रुपये, या दराने महापालिकेने वडापाव सेंटर्सकरता ही निवीदा जाहीर केली आहे. ज्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ प्रभागांच्या १२८ वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक-एक वडापाव सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी नागरिक पैशाच्या मोबदल्यात प्लास्टिकच्या ५ बाटल्या देऊन एक वडापाव आणि चहा घेऊ शकणार आहेत. म्हणजेच ५ बाटल्या जमा केल्यानंतर एक चहा तर १० बाटल्या जमा केल्यानंतर एक वडापाव नागरिकांना मिळणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वडापाव सेंटरच्या चालकाला या प्लास्टिकच्या बाटल्यांचा हिशोब लेखी स्वरुपात महापालिकेला सादर करावा लागणार आहे. यानंतर महापालिका या वडापाव सेंटर चालकाला २० रुपयाप्रमाणे त्याचे पैसे अदा करणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने या योजनेची जाहीरात काढली असून, अर्ज यायला सुरुवात झाल्यानंतर महापालिका स्वतः यात वडापाव सेंटर्स चालकांची निवड करणार आहे.
शहरातील गरीब वस्ती आणि झोपडपट्टीतील लोकांना या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या योजनेमुळे शहरात रस्त्यावर इतस्ततः पडणारं प्लास्टिक कमी होऊन यामुळे शहर स्वच्छ आणि नीटनेटकं राहण्यासाठी मदत होईल असा महापालिकेला विश्वास आहे. त्यामुळे महापालिकेच्या या योजनेला शहरात आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT