Girish Mahajan : सेना-भाजप-मनसे युतीचे संकेत; नार्वेकरांबाबतही मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

22 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:42 AM)

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. या निमित्ताने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे तिघेही एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आपल्या खास शैलीत भाषण करत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं तर शिवसेना […]

Mumbaitak
follow google news

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. या निमित्ताने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे तिघेही एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आपल्या खास शैलीत भाषण करत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं तर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोले लगावले.

हे वाचलं का?

दरम्यान, या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना-भाजप-मनसे युती होणार का? या प्रश्नांनी जोर धरला आहे. यावरच बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी या महायुतीचे स्पष्ट संकेत दिले. ते आज नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे एका खाजगी योगा संस्थेच्या उद्घाटनानंतर बोलत माध्यमांशी बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले, दिवाळी सणानिमित्त एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले होते. याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही. पण राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं. पण शेवटी मनसे बाबत पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याबाबतही मोठा गौप्यस्फोट केला. एमसीए निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्वपक्षीय एकत्र आले होते. या निवडणुकीच्या स्नेहभोजनानिमित्त एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या जवळीकतेची चर्चा रंगली होती. अशातच, मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर नाराज आहेत, असा खळबळजनक दावा महाजन यांनी केला. तसंच नार्वेकर यांचे अमित भाईंशी चांगले संबंध असल्याचं सांगत शिवसेनेत कोण राहील कोण जाईल सांगता येत नाही, असही वक्तव्य महाजन यांनी केलं.

नाशिकचे खड्डे पुन्हा चर्चेत :

दरम्यान, नाशिककडे येणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मला या खड्ड्यांमुळे आज ट्रेननं यावं लागलं असल्याची कबुली देखील स्वतः महाजन यांनी दिली. मात्र खड्डयांबाबत मी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र फाटक यांच्याशी देखील बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरात लवकर काम करण्याशिवाय गत्यंतर नाही, गडकरींशी देखील मी बोलणार आहे, असे ते म्हणाले.

    follow whatsapp