पणजी : सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील कर्लीज क्लबला पाडकाम कारवाई आदेशावर स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे गोवा सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. याच क्लबमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटला पार्टीमध्ये ड्रग्ज देण्यात आले असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.
ADVERTISEMENT
२२-२३ ऑगस्ट रोजी सोनाली फोगटचा गोव्यात मृत्यू झाला होता. यानंतर गोवा प्रशासनाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अर्थात नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल आदेशानुसार कर्लीज क्लब पाडण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार आज सकाळी साडेसात वाजता अंजुना पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.
मात्र क्लबने सर्वोच्च न्यायालयात धाव घेवून तात्काळ सुनावणीची मागणी केली. क्लबच्या वतीने न्यायालयात अॅड. हुजैफा अहमदी यांनी बाजू मांडली. दुसऱ्या पक्षाचे म्हणणं ऐकून न घेता एनजीटीने क्लब पाडण्याचे आदेश दिले असल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला.
एनजीटीचे क्लब पाडण्याचे आदेश
कर्लीज क्लब रेस्टॉरंट कोस्टल रेग्युलेशन झोनच्या नियमांचे उल्लंघन करून ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. तपासानंतर गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने 2016 मध्ये क्लब पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला क्लबने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात आव्हान दिले होते.
न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधिकणाच्या खंडपीठाने 6 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करताना गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीचा निर्णय कायम ठेवला.यानंतर गुरुवारी (८ सप्टेंबर) जिल्हा प्रशासनाने क्लब पाडण्याचे आदेश जारी केले.
सोनालीला ड्रिंकमध्ये ड्रग्ज देण्यात आले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट 22 ऑगस्ट रोजी गोव्यात आली होती. ती अंजुना येथील हॉटेल ग्रँड लिओनी रिसॉर्टमध्ये थांबली होती. त्यानंतर 22-23 ऑगस्टला कर्लीज क्लबमध्ये पार्टी होती. या पार्टीत सोनालीही गेली होती. या पार्टीत सोनालीला ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिसळून देण्यात आले होते. कर्लीज क्लबमध्ये पार्टी करून सोनाली हॉटेलमध्ये परतली त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी सकाळी अस्वस्थत वाटू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT