गोव्यात नवीन सरकार होळीनंतरच? प्रमोद सावंत दिल्लीला रवाना

मुंबई तक

• 12:03 PM • 15 Mar 2022

एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरवत गोव्यात भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तीन अपक्ष आणि मगो पक्षाच्या पाठींब्याच्या जोरावर गोव्यात भाजप सत्ता स्थापन करणार आहे. आज नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी पार पडला. परंतू अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय नक्की झाला नसल्यामुळे गोव्यात नवीन सरकार होळीनंतरच स्थापन होईल अशी चिन्ह दिसत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी आघाडीवर असलेले डॉ. प्रमोद सावंत […]

Mumbaitak
follow google news

एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरवत गोव्यात भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तीन अपक्ष आणि मगो पक्षाच्या पाठींब्याच्या जोरावर गोव्यात भाजप सत्ता स्थापन करणार आहे. आज नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी पार पडला. परंतू अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय नक्की झाला नसल्यामुळे गोव्यात नवीन सरकार होळीनंतरच स्थापन होईल अशी चिन्ह दिसत आहेत.

हे वाचलं का?

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी आघाडीवर असलेले डॉ. प्रमोद सावंत हे आज आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर दिल्ली रवाना झाले आहेत. प्रमोद सावंत नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि इतर अन्य ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. केंद्रातील निरीक्षक नेत्याच्या निवडीसाठी गोव्यात येतील. मी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी जात आहे अशी माहिती प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Goa Result : मीच मुख्यमंत्री होणार ! डॉ. प्रमोद सावंत यांना आत्मविश्वास

दरम्यान उत्पल पर्रिकर यांचा पराभव करुन पणजी मतदारसंघातून विजयी झालेले बाबुश मोन्सेरात यांनी मगो पक्षाने भाजपत विलीन होण्याची मागणी केली आहे. “आम्ही यातून धडा शिकलो आहोत. सर्वात आधी त्यांनी आमच्याविरुद्ध प्रचार केला आणि आता ते आमच्यासोबत आहेत. मग आमच्याकडे बहुमत आणि अपक्षांचा पाठींबा असताना आम्ही त्यांना का सामावून घ्यायचं. त्यामुळे राज्यात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मगो पक्षाने भाजपमध्ये विलीन व्हावं”, असं मोन्शेरात म्हणाले.

बाबुश मोन्सेरात यांना प्रत्युत्तर देताना मगो पक्षाचे सुदीन ढवळीकर यांनी मी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरुन सरकारमध्ये सहभागी झालो आहे असं सांगितलं. “बाबुश हे माझे मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही. मी केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरुन सरकारमध्ये आलो आहे. त्यामुळे आम्ही आता गोव्यात स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”

निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात…

मगो आणि भाजपमधील वादासोबतच विश्वजीत राणे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून गोव्याच्या राजकारणात सुरु आहे. परंतू विश्वजीत राणे यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. “मुख्यमंत्री व्हायची माझी इच्छा नाही, केंद्रीय नेतृत्व माझी जबाबदारी ठरवेल. आमच्यापैकी कोणामध्ये मतभेद नाही.” विश्वजीत राणे यांच्या पत्नी आणि नवनिर्वाचीत आमदार दिव्या राणे यांनी बोलत असताना प्रत्येक उमेदवाराच्या मनात काही ना काही इच्छा या असतातच असं वक्तव्य केलं आहे.

वाळपोई विश्वजीत राणेंचीच! कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय केंद्रातील नेतृत्व घेईल आणि भाजपत गटबाजी नसून याबद्दल सर्वांचं एकमत होईल असंही दिव्या राणे यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसला पुन्हा सुरुवात करण्याची गरज- BJP ची साथ सोडलेल्या मायकल लोबोंचा पक्षाला सल्ला

    follow whatsapp