मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर विमानतळावर कस्टमने कसून केलेल्या तपासणीत एका प्रवाशाकडून दोन किलो सोने जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. या सोन्याची किंमत एक कोटी असल्याचे समजते.
ADVERTISEMENT
गौतम सेठिया या प्रवाशाकडून जप्त करण्यात आलं सोनं
14 ऑक्टोबर रोजी शारजा येथून पहाटे 04:32 वाजता नागपूर विमानतळावर आलेल्या गौतम सेठीया या प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले. 1748 ग्रॅम सोने, 10 बिस्कटं आणि 02 बांगड्या, आणि 100 ग्रॅम सोन्याची 10 बिस्किटे आढळून आली. त्या नंतर कस्टम अधिकाऱ्याने प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. या प्रवाशाची कसून चौकशी सुरू आहे.
मागच्या महिन्यातही करण्यात आली होती कारवाई
सप्टेंबर २०२२ मध्ये म्हणजे मागील महिन्यातच दुबईहून हातोड्यातून होत असलेली सोन्याची तस्करी कस्टम आणे पोलिसांनी पकडली होती. पोलिसांनी या लुटारूंकडून तब्बल ३३७ ग्राम सोने जप्त केले. अक्रम मलिक दीन मोहम्मद (वय ३२), इर्शाद खान इशाक खान (वय २१, दोन्ही रा. नागौर, राजस्थान) आणि राहुल हरिश्चंद्र यादव (वय २४, रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) या तिघांना अटक केली होती.
नागपूर विमानतळ ठरतंय सोने तस्करीचा नवा मार्ग?
विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ दुबईमार्गे सोने तस्करीचा नवा मार्ग ठरत असल्याची माहिती दिली होती. नागपूर पोलिसांनी विमानतळावर पाळत ठेवून तिघांना पार्किंग लॉटमधून ताब्यात घेतले होते. या तिघांनी यापूर्वीच्या दरोड्यात टिपरचे काम केले होते. कस्टम ड्यूटी वाचविण्यासाठी कामगारांचा उपयोग अशाप्रकारे केला जातो.
शारजा, दुबई येथे मजुरी करण्यासाठी येथे संपूर्ण राज्यातून तसेच देशातून मोठ्या संख्येने मजूर तसेच कामगार जातात. यात राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कामगारांचाही समावेश आहे. सोने तस्करीसाठी प्रामुख्याने नागौरचे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी १० जानेवारी २०२२ रोजी शारजाह येथून शरीरामध्ये लपवून आणलेले तीस लाख किंमतीचे सोने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले होते. सीमा शुल्क विभागाने (कस्टम) ही कारवाई केली होती.
ADVERTISEMENT