मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या (Corona free) कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे (villages) लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज (2 जून) मुंबईत केली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक (cabinet meeting) पार पडल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखण्यात यावं. तसंच ज्या गावांनी कोरोनाचा शिरकाव आपल्या गावात होऊ दिला नव्हता त्यांचा देखील गौरव केला होता. त्या दृष्टीने आता या उपक्रमास अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
Corona मुक्त गाव! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
कोरोनामुक्त गावांना किती लाखांचं बक्षीस मिळणार?
-
कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार.
-
6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.
कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे
याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष (2515) व (3054) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे. असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
पाहा कोरोनामुक्त गाव मोहीमेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते:
‘महाराष्ट्रातील हिवरेबाजार, घाटणे ही गावं कोरोनामुक्त झाली. मग प्रत्येक गाव कोरोनामुक्त का होऊ शकत नाही? कोरोना मुक्त घर करा, कोरोनामुक्त वस्ती या गोष्टींचा निश्चय सगळ्यांनी करावा. ‘कोरोनामुक्त गाव’ ही नवी मोहीम आपण सुरू करतो आहे. कोरोनामुक्त गावं करणं हे आता महाराष्ट्र सरकारचं उद्दीष्ट आहे. कोरोनामुक्त गाव, कोरोना मुक्त तालुका, कोरोनामुक्त जिल्हा आणि कोरोना मुक्त महाराष्ट्र अशा टप्प्यांमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे.’
Maharashtra Unlock News : चक्रीवादळ, कोरोना ते लॉकडाउन, जाणून घ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे
‘हिवरेबाजार आणि घाटणे ही गावं जर कोरोनामुक्त होऊ शकतात तर मग आपली गावं का कोरोनामुक्त होऊ शकत नाही? ती नक्कीच होऊ शकतात. हिवरेबाजार सारखा प्रयत्न राज्यातील काही सरपंच व गावे करीत आहेत. मी त्यांचेही कौतुक करतो. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख, कोमल ताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे आज कोव्हिडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे.’
‘सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरे बाजार सारखे शिस्तबद्ध रीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोव्हिडशून्य गाव करता येऊ शकलं आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे असे आवाहन मी करतो. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.’ असं मुख्यमंत्री आपल्या संबोधनात कोरोना मुक्त गाव मोहीमेबाबत म्हणाले होते.
ADVERTISEMENT