आजोबांकडे असलेलं सोनं आणि पैसे मिळवण्यासाठी नातवाने आजोबांची हत्या केली. त्यांचा मृतदेह घरातच पुरला. ही घटना आता 45 दिवसांनी उघड झाली आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुरज सुधाकर सेलकर (वय-24) असं खून करणाऱ्या नातवाचं नाव आहे. तर कवडू देटे असं आजोबांचं नाव आहे. ते 75 वर्षांचे होते. या प्रकरणी सुरजने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय आहे प्रकरण?
सुरज सुधाकर सेलकर हा 24 वर्षांचा तरूण त्याच्या आजोबांकडे आला. त्यानंतर तो त्यांच्याचकडे राहू लागला होता. सुरजची नजर आजोबांच्या पैशांवर आणि सोन्यावर होती. या पैशांवरूनच 5 जानेवारीला दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सुरजने आजोबांच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांड्याने वार केले. यामुळे आजोबा कवडू देटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा यातच मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरजने आजोबांचा मृतदेह घरातल्या मागच्या भागात वऱ्हांड्यात पुरला. त्यानंतर घरातच राहू लागला. काहीही झालं नाही अशा अविर्भावात राहू लागला.
45 दिवसांनी देटे यांची मुलगी म्हणजेच आरोपीची आई आपल्या वडिलांना भेटायला आली. घरात दुर्गंधी येत होती आणि वडील कुठेही दिसत नव्हते. काही ठिकाणी तिला रक्ताचे डागही आढळले. आईने वडिलांबाबत मुलाला विचारलं तेव्हा आजोबा पिशवी घेऊन बाहेर गेले आहेत असं उत्तर तिच्या मुलाने म्हणजेच सुरजने दिलं. मात्र काहीतरी वाईट घडलं आहे अशी शंका त्यांना आली. त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली
पोलिसांनी आपली तपास यंत्रणा फिरवली, नातवाला विचारपूस केली. पोलिसांना नातवावर संशय आला, नातवाची कसुन चौकशी केली तर हत्या केल्याची आणि प्रेत घरीच पुरुन ठेवल्याची कबुली नातवाने दिली. पोलिसांनी 45 दिवसानंतर घरात पुरलेला मृतदेह बाहेर काढला. कवडू देटे -75 असे मृतकाचे नाव आहे. तर आरोपी नातू सुरज सूधाकर सेलकर -24 याला पोलीसांनी अटक करुन हत्येचा गुन्हा नोंदवला
ADVERTISEMENT