जेव्हा जेव्हा काँग्रेसला निवडणुकीत पराभव दिसू लागतो त्या त्या वेळी ते पंतप्रधान मोदींना शिव्या देण्यास सुरूवात करतात. जेव्हा जेव्हा त्यांना हे कळतं की मोदींइतकं विकासाचं मोठं मॉडेल नाही, आपण त्याचा विचारही करू शकत नाही हे पटतं तेव्हा ते मोदींना शिव्या देऊ लागतात असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली. त्यांना दिसू लागलेल्या पराभवाचंच हे लक्षण आहे. अशांना गुजरातची जनता कधीही माफ करणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींबाबत अपशब्द वापरले. त्यांनी हे सिद्ध केलं आहे की गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा दुसरा कुठलाही उपाय त्यांच्याकडे नाही. नेता आणि नीती दोन्हीही काँग्रेस गमावून बसलं आहे त्यामुळे ते ही भाषा वापरत आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
एक मोठी विडंबना ही आहे की ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं असे लोक त्यांना रावणाची उपमा देत आहेत ज्यांनी ७०० वर्षांचा कलंक मिटवून राम मंदिराच्या निर्मितीचं काम केलं. मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण म्हटलं त्याला उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी अशा शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. मला हे विचारायचं आहे की रावणाचे सहकारी कोण? जे रामाच्या अस्तित्वावर शंका घेतात ते रावणाचे सहकारी की ७०० वर्षांपासून चर्चेत असलेल्या राम मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू करणारे मोदीजी? मी आणखी एक इतिहास आपल्या समोर ठेवू इच्छितो. जेव्हा जेव्हा काँग्रेसने, विरोधी पक्षांनी मोदींना शिव्या दिल्या आहेत देशातल्या आणि राज्यांतल्या जनतेने मतांच्या माध्यमांतून त्यांना उत्तर दिलं आहे. गुजरातमध्येही हेच होणार आहे. जनता अशा लोकांना त्यांची लायकी दाखवून देईल. मी हा शब्द वापरणार नव्हतो मात्र कधी कधी असा शब्द वापरावा लागतो असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. मोदींना रावण म्हणणाऱ्यांना गुजरातची जनता माफ करणार नाही.
ADVERTISEMENT