प्रविण ठाकरे
ADVERTISEMENT
नाशिक: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai international Airport) नावावरुन सध्या जो संघर्ष सुरु आहे त्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि अन्न वितरण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याबाबत आता एक वेगळंच वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे याबाबत नवं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. त्यासाठी आंदोलन देखील सुरु आहे. अशातच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच (10 जून) स्पष्ट केलं की, या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचंच नाव देण्यात येणार आहे.
पण दुसरीकडे छगन भुजबळ यांना जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी एक वेगळंच मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, ‘जर आज बाळासाहेब ठाकरे हयातीत असते तर त्यांनी आपलं नाव विमानतळाला देण्यास साफ नकार दिला असता.’ छगन भुजबळांच्या अशा वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचं नाव ठरलं, ठाकरे सरकारचा नेमका निर्णय काय?
‘याबाबत दोन्ही बाजूंनी लढाई सुरु आहे. पण याबाबत मी काही बोललो तर ते योग्य ठरणार नाही. पण मला राहवत नाही म्हणून मी बोलतोय. ‘बाळासाहेब ठाकरे जर आज हयातीत असते तर त्यांनी म्हटलं असतं की, या विमानतळाला जे. आर. डी टाटा यांचं नाव दिलं जावं.’
‘त्यांचे विचार अशाच स्वरुपाचे होते. त्यांनी व्हीटी स्टेशनला देखील नाना शंकरशेट नाव द्यावं असंही अनेकदा म्हटलं होतं. ते यासाठी म्हणायचे की, ही जी लोकं आहेत त्यांनी शहरांचा विकास करण्यात मोठी भूमिका बजावली होती.’
‘खरं तर आता जे नाव ठरलं आहे त्यावर सहमती झाली पाहिजे. शांततेच्या मार्गाने यावर मार्ग काढावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा पाठिंबा आहे. विरोध असण्याचं काही कारण नाही. दि. बा. पाटील यांचं देखील काम मोठं आहे.’
‘आम्ही पाहिलं आहे. त्यांनी भूमिपत्रांना न्याय देण्यासाठी अनेक आंदोलनं केली होती. त्यामुळे प्रत्येक नेता हा आपआपल्या ठिकाणी मोठाच आहे आणि विमानतळ एकच आहे. मला वाटतं मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे हे याबाबत नक्कीच योग्य निर्णय घेतील.’ अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन भाजप-शिवसेना आमनेसामने… नेमकं प्रकरण काय?
या नामकरणावरुन आता जो वाद पेटला आहे त्यावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये देखील फारशी एक वाक्यता नसल्याचं दिसून आलं आहे.
छगन भुजबळ यांनी नाशिकमधील पत्रकारांशी संवाद साधताना दि. बा. पाटील आणि बाळासाहेब ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या नावाला समर्थन देत एक संदिग्धता कायम ठेवला आहे. ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव’
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तशा प्रकारचा ठराव सिडकोने केलेला आहे. बाळासाहेबांचं योगदान हे राज्याला नव्हे तर देशाला लाभलं होतं. त्यामुळे या विमानतळाला त्यांचं नाव दिलेलं आहे. यापूर्वी यामध्ये कुठलंही नामकरण किंबहुना ठराव दि. बा. पाटील यांच्या नावाचा झाला नव्हता.’
‘दि. बा. पाटील यांचा आम्ही आदरच करतो. नक्कीच त्यांनी भूमिपूत्रांसाठी आणि साडेबारा टक्के योजनेसाठी त्यांनी संघर्ष केला. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत संघर्ष समितीची काल बैठक देखील झालेली आहे.’
‘मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं आहे की दि. बा. पाटील यांच्याबाबत आम्हाला खूप आदर आहे. म्हणून दोन्ही नेते आहेत ते मोठे नेते आहेत. बाळासाहेबांच्या नावाला कुणाचा आक्षेप असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हे सामोपचाराने झालं पाहिजे यामध्ये वादविवाद होता कामा नये.’ असं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT