(Rahul Gandhi) सध्याची स्थिती चिंताजनक आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याची मागणी आणि गांधी कुटुंबाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या G23 गटातील सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी ही टीका केली आहे. एवढंच नाही तर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. मागच्या चार वर्षांपासून राहुल गांधी भेटलेले नाहीत असंही त्यांनी म्हणत खंत व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत पृथ्वीराज चव्हाण?
मी जेव्हा दिल्लीत असतो तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतो. त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ते रूग्णालयात आहेत, मात्र वेळ मागितली तर ते बोलायला तयार असतात. सोनिया गांधी यांच्याकडेही वेळ मागितल्यावर त्यादेखील भेटतात मात्र राहुल गांधी यांना मागच्या चार वर्षांपासून भेटता आलेलं नाही, असं म्हणत पृथ्वीबाबांनी खंत बोलून दाखवली.
उदयपूरच्या चिंतन बैठकीतही फारसं काहीही झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षांनी पक्षासमोर निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबीर आयोजित केलं होतं. मात्र कुणी राजापेक्षा जास्त निष्ठावान अशा आशयाचा निर्णय घेतली की चिंतन किंवा आत्मवपरीक्षणाची गरज नाही असंच अनेक नेत्यांना वाटतं. चिंतन शिबिरात प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवं होतं, एखाद्याला लक्ष्य करण्यापेक्षा अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधींसमोर खदखद केली व्यक्त; काय घडलं भेटीत?
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी ही सगळी खंत व्यक्त केली आहे. तसंच काँग्रेस पक्षातल्या सद्यस्थितीबाबत आपली मतं मांडली आहेत. कपिल सिब्बल यांच्यासारखा नेता अस्वस्थ होऊन दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेची निवडणूक लढवतो आहे. पक्षात असलेली अस्वस्थता त्यातूनच पुढे आली आहे. आम्ही २३ जणांनी याबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात लढा देण्यासाठी पक्षाला पूर्णवेळ कार्यरत असलेल्या आणि रोज कार्यकर्त्यांना भेटणाऱ्या अध्यक्षाची गरज आहे असं त्यांनी स्पष्टच बोलून दाखवलं.
गेल्या २४ वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. आता नव्या रक्ताला वाव देण्यासाठी या निवडणुका होणं आवश्यक आहे. काँग्रेसला नवा अध्यक्ष हवा आहे तो निवडून आलेला हवा, भलेही तो कोणत्या परिवाराचा सदस्य असो. पूर्ण वेळ अध्यक्ष असेल तर सहकारी पक्षांशी चर्चा करणंही शक्य होतं आणि त्यांच्यात स्पष्टता राहते असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT