सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेक सिने कलाकारांना शेतकरी आंदोलनावरून सरकारला पाठिंबा देणारं जे ट्विट करावं लागलं त्यामागे केंद्र सरकारचा दबाव होता का? या गोष्टीची चौकशी आता केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आश्वासन दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज झूम कॉलद्वारे अनिल देशमुख यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी ही बाब अनिल देशमुख यांना सांगितली तसंच यासंदर्भातली चौकशी केली जावी अशीही विनंती केली. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेमार्फत या गोष्टीचा तपास केला जाईल असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
गेल्याच आठवड्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी सचिन सावंत यांनी झूम कॉलद्वारे संवाद साधला. पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनावरून सरकारला पाठिंबा देणारं ट्विट केलं होतं. त्यातला मजकूर कसा सारखा आहे हे दाखवण्यासाठी सचिन सावंत यांनी अभिनेता अक्षय कुमार आणि फुलराणी सायना नेहवाल यांच्या ट्विटमधली भाषा अगदी सारखी कशी आहे याचे स्क्रीन शॉट्सही शेअर केले होते.
नेमकी हीच बाब त्यांनी अनिल देशमुख यांनाही सांगितली. तसंच सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही मोदी सरकारला पाठिंबा देण्यासाठी ट्विट केलं होतं. या सगळ्यामागे भाजपचा हात आहे असा संशय आपल्याला असल्याचं सचिन सावंत यांनी सांगितलं. तसंच या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जावी अशीही मागणी त्यांनी अनिल देशमुख यांच्याकडे केली. ज्यानंतर गुप्तचर यंत्रणेकडून या प्रकरणी चौकशी केली जाईल असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले सचिन सावंत?
“एक काळ असा होता की बॉलिवूडवर अंडरर्वल्डचा दबाव होता. आता मात्र अशा प्रकारांची व्याख्या पूर्णतः बदलून गेली आहे. खेळाडूंवर बीसीसीआयकडून दबाव टाकला जातो आहे. तशाच प्रकारचा दबाव हा बॉलिवूड कलाकारांवरही आहे. या सगळ्यामागे कोण आहे हे शोधणं आवश्यक आहे.”
सचिन सावंत यांनी ही बाब झूम कॉलमध्ये लक्षात आणून दिल्यानंतर या प्रकरणी चौकशी केली जाईल असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.
ADVERTISEMENT