मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे चांदीवाल आयोगाच्या चौकशीसाठी हजर झाले. चौकशी आयोगाने त्यावेळी परमबीर सिंग यांच्याविरोधातला जामीनपात्र वॉरंट रद्द करून त्यांना 15 हजारांचा दंड ठोठावला. यावेळी परमबीर सिंग आणि सचिन वाझे समोरासमोर आले होते. या दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. याबाबत चर्चा रंगली आहे. दिवसभर हा विषय चर्चेत होता, आता यासंबंधी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
‘ जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली याची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सांगण्यात आलं आहे’
पोलिसांवर दबाव आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, ‘तसा काही प्रश्न उद्भवत नाही. दबाव असण्याचं कुठलंही कारण नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टातून संरक्षण घेतलं आहे. ज्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत तिथे जबाब देत आहेत.’ राज्य सरकार सीबीआयला सहकार्य करत असल्याचं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावले. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची कारवाई सुरु असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
दरम्यान परमबीर सिंग यांनी पदभार स्विकारला आहे का? असं विचारण्यात आलं असता दिलीप वळसे पाटील यांना नकार देत त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत संपर्क साधला नसल्याची माहिती दिली. तसंच परमबीर सिंग सेवेत नसताना त्यांनी सरकारी वाहनाचा वापर करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान वाझे-सिंगभेटीबद्दल साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी केली. एक उपनिरीक्षक आणि तीन शिपायांचे जबाब नोंदवल्यानंतर त्याची कागदपत्रे नवी मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्यात आली. वाझेंसोबत आलेले पोलीस नवी मुंबई पोलीस दलाला संलग्न असल्यामुळे ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी सांगितले. या प्रकरणाची गृह विभागाकडून माहिती घेण्यात आली.
नेमकं काय घडलं?
परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे एका खोलीत सुमारे तासभर एकमेकांशी बोलत होते त्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांच्या वकिलाने या गोष्टीला जोरदार आक्षेप घेतला होता. ही बातमी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली जे नंतर न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांकडे याप्रकरणी तपास करण्यास सांगितलं आहे.
वाझे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून सिंग आणि वाझे याच्याविरुद्ध गोरेगाव येथे दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातही तो आरोपी आहे.
ADVERTISEMENT