प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
नाशिकमधल्या बंद गाळ्यांमध्ये कान, मेंदू आणि डोळे असे मानवी अवयव आढळल्याने खळबळ उडाली आहे. भरवस्तीत मानवी अवयव आणि सांगाडे आढळल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव आणि सांगाडे आढळल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. शहराच्या मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या पाठीमागील सोसायटीत रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हे अवयव वेगवेगळे असून वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित आणि साठवणूक केल्याचे आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान असे वेगवेगळे मानवी अवयव ठेवण्यात आले आहेत. तर बादलीमध्ये देखील केमिकल प्रक्रिया करून मानवी अवशेष ठेवले आहेत. याप्रकरणी गाळेधारकाकडे विचारणा केली असता, त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. जवळपास पंधरा वर्षापासून गाळे बंद असल्याचा मालकाने दावा केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर हे गाळे देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कान, नाक, घसा तज्ञ डॉ. किरण शिंदे यांच्या आईच्या नावे तो गाळा आहे. डॉ. शिंदे यांनी सरावासाठी 2005 मध्ये मुंबई येथून कानाचे अवशेष आनलेले होते. मात्र गाळ्याची चावी हरवल्याने त्यांनी गाळा उघडला नव्हता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत. मानवी अवशेष बाळगता येतात का याची शहानिशा पोलिस करीत आहेत.
उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, आनंदा वाघ, सुनील रोहकले यांच्यासह न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं पथक घटनास्थळी पोहचलं. त्यांनी गाळा उघडला असता त्यांना अनेक भंगार वस्तूही तिथे आढळल्या. भंगारात प्लास्टिकचे दोन डबे होते ते जेव्हा उघडण्यात आले तेव्हा मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली. पोलिसांनी मास्क लावून बॅटरीच्या मदीतने पाहणी केली असता रासायनिक द्रव्यांमध्ये मानवी अवयव जतन केल्याचं दिसून आलं. पोलिसांनी गाळामालक शुभांगिनी शिंदे यांनाही बोलावलं. त्यांची दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. त्यांनाही पोलिसांनी या ठिकाणी बोलावून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी चौकशी सुरू होती.
ADVERTISEMENT