बीडच्या गेवराई तालुक्यातील एका धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जो कोळगाव येथील सूर्यमंदीर संस्थानच्या महाराजांचा व्हिडिओ असून त्यात आपण आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यमंदीर संस्थानच्या हनुमान महाराजांवर तीन दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज (८ फेब्रुवारी) त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विनयभंगाचा आरोप झालेल्या महाराजांनी व्हिडिओत नेमकं काय म्हटलंय?
‘मी रस्त्याने जात असताना बाबासाहेब कांबळे यांनी आपल्या आपल्या घरी मला चहासाठी बोलवलं. मी गेलो तेव्हा मला त्यांचा घराच्या दरवाजा तुटलेला दिसला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, तुम्ही हा दरवाजा दुरुस्त करुन घ्या. त्यावेळी त्यांनी अचानक माझ्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे माझे काही कार्यक्रम झाले नाही त्यामुळे माझ्याकडे फार काही पैसे नाही. तरीही जर काही ५-१० हजारांची मदत करता आली तर मी तुम्हाला करेन. या अगोदर देखील त्यांनी माझ्याकडून १०-१० हजार उसने घेतले होते आणि ते त्यांनी मला परत देखील केले होते. त्यामुळे यावेळेस जर काही शक्य झालं तर मी मदत करेन असं त्यांना म्हटलं होतं. दरम्यान, त्यावेळी त्यांनी मला दुसऱ्या दिवशी घरी जेवणाला यावं अशी विनंती केली होती.’
‘दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा त्यांच्या घरात त्यांचीच एक १३-१४ वर्षांची मुलगी देखील होती. तिला त्यांनी काही वाक्यं शिकवून ठेवली होती. त्यामुळे तेवढीच वाक्य ती बोलायची, बाकी काही नाही त्यांना फक्त माझ्याकडून पैसे उकळायचे होते. जेव्हा मी जेवणासाठी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा बाबासाहेब कांबळे यांनी मला सांगितलं की, शेतातील मोटर बंद करायची आहे आणि ते निघून गेले. पण त्यांच्या घरात कुणीही पुरुष नसल्याने मी देखील त्यांच्या पाठोपाठ घराबाहेर पडलो. त्यानंतर मध्ये एक दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी हे कांबळे कुटुंबियांमधील सर्वच जण माझ्या घरी आले. त्यानंतर काही महिलांनी मला मारहाण सुरु केली. याचं देखील त्यांनी मोबाइलवर शूटिंग केलं.’
‘या सगळ्या प्रकारानंतर मला बाजूच्या खोलीत नेऊन कांबळे कुटुंबीयांनी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली आणि मला धमकावलं देखील की, जर हे पैसे दिले नाही तर आम्ही व्हिडिओ व्हायरल करु. त्यावेळी त्यांना म्हटलं देखील माझी बदनामी करु नका. माझ्याकडे सध्या काहीही पैसे नाही. यावेळी त्यांनी मला धमकी देखील दिली की, तुमच्याविरोधात आम्ही विनयभंगाचा गुन्हा दाखल करु. मी म्हटलं पैसे मला देता येणार नाही. त्यानंतर त्यांनी मला गावात नेलं. तिथं देखील मी सर्वांना सांगितलं की, माझी एवढीच चूक झाली की, यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं आणि मी त्यांच्या घरी गेलो. हा सगळा प्रकार फक्त आणि फक्त माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी झाला आहे. यापुढे मला संस्थानवर राहाण्याची इच्छा नाहीच, पण जिवंत देखील राहण्याची इच्छा नाही. मला जीवन जगण्याची इच्छा नाही त्यामुळे मी आता आत्महत्या करत आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची मी माफी मागत आहे.’ असं व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओसोबतच हनुमान महाराज यांनी सुसाईड नोट देखील लिहली आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर आता संपूर्ण गेवराई तालुक्यात याचविषयी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT