ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटने राहुल गांधी यांचे ट्विटर हँडल, काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांची ट्विटर खाती तात्पुरती बंद केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र नियमांचं उल्लंघन झाल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं ट्विटर इंडियाने म्हटलं होतं. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतःचे, पक्षाचे आणि इतर नेत्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक केल्याबद्दल ट्विटरवर निशाणा साधला आहे. ट्विटर इंडिया मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार वागत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर इंडिया करते आहे असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हीडिओ शेअर केला आहे. ‘एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचं काम ट्विटर इंडिया करत आहे. हा देशाच्या लोकशाही यंत्रणेवर असलेला हल्ला आहे. हा हल्ला फक्त राहुल गांधी म्हणून माझ्यावर नाही. हा फक्त आवाज बंद करण्याचा प्रश्न नाही तर लाखो आणि कोट्यवधी लोकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे.’
राहुल गांधींचं ट्विटर लॉक करण्यामागे नेमकं काय कारण?
पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीतील छावणी परिसरात एका 9 वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. आईवडिलांची संमती न घेताच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला होता. घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि तिच्या आईवडिलांसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या फोटोतून पीडितेची ओळख उघड होत असल्याने ट्विटरकडून ते ट्विट हटवण्यात आलं होतं. तसेच ट्विटर हॅण्डल लॉक करण्यात आलं. आता याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी ट्विटरवर आरोप केला आहे. तसंच हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचंही म्हटलं आहे.
गुरूवारी काय म्हणाले होते राहुल गांधी?
जर कुणाबद्दल द्या वा सहानुभूती दाखवणं गुन्हा असेल, तर मी गुन्हेगार आहे. जर बलात्कार आणि खूनाच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी करणं चूक असेल, तर मी दोषी आहे’, असा रोख सवाल राहुल गांधींनी केला आहे.
‘ते आम्हाला एका प्लॅटफॉर्मवर लॉक करू शकतात; पण लोकांसाठी उठणारा आमचा आवाज बंद करू शकत नाही. द्याभाव, प्रेम आणि न्याय हा वैश्विक संदेश आहे. १३० कोटी भारतीयांना गप्प करू शकत नाही’, अशा शब्दात राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे केंद्रावर टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT