Phone Tapping प्रकरणी आयपीएस रश्मी शुक्लांना अटक होणार नाही हे आता बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी केस दाखल केली होती त्यावर आता हा निर्णय देण्यात आला आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये आहेत. पोलिसांनी तिथे जाऊन कॅमेरावर त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा असंही कोर्टाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार चालतो हे उघड करणारा एक अहवाल रश्मी शुक्ला यांनी तयार केला होता. यामध्ये काही बड्या दिग्गजांचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. यासाठी त्यांनी फोन टॅपिंग केलं होतं. या फोन टॅपिंगचं प्रकरण परमबीर सिंग यांच्या प्रकरणानंतर बाहेर आलं होतं. मार्च महिन्यात हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाष्य केलं होतं. त्यानंतर रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
‘भाजपच्या एजंट’ असा आरोप झालेल्या रश्मी शुक्ला कोण?
रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० ला लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
पोलिसांच्या बदलीसाठी काही राजकीय संबंध असलेले दलाल काम करत आहेत यासंदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर आणि आरोप झाल्यानंतर मी हे संपूर्ण प्रकरण तपासलं. त्यासाठी काही फोनही टॅप केले. जाणीवपूर्वक काही फोन नंबर हे सर्व्हिलन्सवर होते. ज्यासाठीची मी रितसर परवानगी घेतली होती. या फोन टॅपिंग आणि इतर गोळा केलेल्या माहितीनंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यासंदर्भातली माहिती आपण तातडीने मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी असं मला वाटतं आहे. जे आरोप झाले ते धक्कादायक आहेत आणि समोर आलेलं वास्तवही जळजळीत सत्य आहे.
पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट आणि त्यासाठी काम करणारे काही दलाल कार्यरत आहेत. या सगळ्यांचा जवळचा संबंध काही राजकारण्यांशी आहे. हे देखील समोर आलं आहे. बदल्यांसाठी काम करणाऱ्या ब्रोकर्सचं रॅकेट आहे ही गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षकापासून ते मोठ्या पदांपर्यंतच्या बदल्यांचा समावेश आहे.
जो डेटा आणि माहिती समोर आली आहे त्यामध्ये असंही समोर आलं आहे की अशा प्रकारची परिस्थिती २०१७ मध्येही निर्माण झाली होती. त्या प्रकरणी या संदर्भात सखोल चौकशी करून ४०२, ४१९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १७०, ५११, ३४ या आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा सात जणांना अटकही करण्यात आली होती. या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेला नवाज हा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
हे संपूर्ण प्रकरण हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं गेलं पाहिजे. तसंच या प्रकरणातले जे दोषी आहेत त्यांच्या संबंधी योग्य ती कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. पोलीस दलातल्या नियुक्त्यांसाठी हे अशा प्रकारचं दलालांचं रॅकेट असणं योग्य नाही त्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली जाते. आपण माझ्या या पत्रातील मुद्द्यांचा बारकाईने विचार करून या सर्व बाबी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवाव्यात.
या आशयाचं पत्र रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना लिहिलं होतं. पोलीस दलातल्या बदल्यांचं रॅकेट कसं चालतं आणि त्यामध्ये काही दलाल काम करत आहेत अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर या विभागाच्या आयुक्त यांनी काही फोन टॅप केले होते. या फोन टॅपिंगनंतर आलेल्या माहितीनंतर रश्मी शुक्ला यांनी हे पत्र पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना लिहिलं होतं.
काय आहे रश्मी शुक्ला यांनी लिहिलेल्या पत्रात? वाचा सविस्तर..
रश्मी शुक्ला यांचा हा अहवाल गुप्त होता. तो समोर आल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले. रश्मी शुक्ला यांनी एका कारणासाठी फोन टॅपिंगची परवानगी मागितली होती आणि भलत्याच लोकांचे फोन टॅप केले असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तसंच मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात केसही दाखल केली. कोर्टाने त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फोन टॅपिंग प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT