ड्रग माफिया म्हणून ओळखला जाणारा कुप्रसिद्ध इक्बाल मिर्ची याचे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेसोबत संबंध होते. तसंच त्याचा मुंबईतील एका आयपीएस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा देखील प्लॅन होता. अशी धक्कादायक माहिती एका ईमेलमुळे उजेडात आली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडीचे आरोपपत्र गेल्या सोमवारी पीएमएलए कोर्टात सादर करण्यात आले होते. त्यामध्येच या ईमेलचा उल्लेख करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे नेमकं प्रकरण:
इकबाल मिर्चीने आयपीएस अधिकारी राहुल राय सूर यांच्याबाबत माहिती मागितली होती. जे 1981 च्या बॅचचे आयपीस अधिकारी होते आणि 1989 के 1992 या दरम्यान ते मुंबई पोलीस दलात नार्कोटिक्स सेलचे उपायुक्त होते. यादरम्यान राहुल सूर आणि नार्कोटिक्स सेलने मिर्ची आणि त्याच्या हस्तकांविरोधात अनेक गुन्हे दाखल केले होते. अनेक गुन्हे दाखल झाल्याने मिर्चीच्या आणि त्याच्या लोकांना ड्रग्स व्यवहारात अडचणी निर्माम झाल्या होत्या. त्यामुळे या सगळ्याला त्यांनी आयपीएस अधिकारी सूर यांना जबाबदार ठरवलं होतं. यामुळे मिर्चीने पाकिस्तानमधील एका पोलीस अधिकारी (फय्याज अली खान) ज्याने आयएसआयसाठी काम केल्याचा संशय होता त्याच्याशी संपर्क साधून सूर आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती आणि पत्ता याबाबत विचारणा केली होती.
1997 साली सूर यांची न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, फय्याज खान याने मिर्चीपर्यंत ही बातमी पोहचवली. पण तो सूर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला करु शकत नाही असंही सांगितलं. कारण सूर हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिसरात राहत होते. दरम्यान, सूर हे प्रतिनियुक्तीवरुन परत आलेच नाही. 2004 साली त्यांना त्यांच्या विभागाने अचानक बरखास्त केलं.
दरम्यान, मिर्ची विरुद्ध जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे त्यात असाही खुलासा करण्यात आला आहे की, फय्याज खान हा जेव्हा पाकिस्तानच्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला दुबईत स्थानांतरित करण्यात आलं होतं आणि त्याचा व्हिसा हा मिर्चीचं हॉटेल इम्पिरिअल सूटद्वारे प्रायोजित केला होता.
ईडीने नुकतेच दाखल केलेल्या एका आरोपपत्रात मिर्चीची बायको हाजरा, त्याची दोन मुलं यांच्यासह अनेक जणांचा समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये ईडीने इक्बाल मिर्चीच्या घरावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात त्याची संपत्ती जप्त केली होती. दरम्यान, याआधीच इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची आणि संबंधितांची पीएमएलए अंतर्गत चौकशी देखील सुरु केली होती. यावेळी कपिल वाधवान, धीरज वाधवान यांच्यासह 5 जणांना अटक देखील केली होती. दुसरीकडे मनी लाँन्ड्रिंगप्रकरणी इक्बाल मिर्चीची पत्नी हाजरा, दोन्ही मुलं यांच्याविरोधात अटक वॉरंट देखील जारी करण्यात आलं होतं.
मुंबई बॉम्बस्फोटानंतर इकबाल मिर्ची हा कुटुंबीयांसह लंडनला पळून गेला होता. मात्र, तरीही त्याच्या मुंबईतील ड्रग्स व्यवहार अनेक काळ सुरुच होता. अखेर 2013 साली त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT