आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. आज संजय राऊत यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन राकेश टिकैत आणि इतर आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. या ठिकाणी जो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे तो पाहून संजय राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर आंदोलनादरम्यान ज्या शेतकऱ्यांचे मृत्यू झाले ते मृत्यू नसून हत्याच आहेत असाही आरोप संजय राऊत यांनी केला. शिवसेनेने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
ADVERTISEMENT
हे पण वाचा – मोदी म्हणाले- शेतकरी एक कॉल दूर, टिकैत म्हणाले नंबर द्या, कॉल करतो
आज गाझीपूर सीमेवर संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं शिष्टमंडळ गेलं. संजय राऊत घटनास्थळी जाताच त्यांनी राकेश टिकैत यांची गळाभेट घेतली. यावेळी राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. संजय राऊत आणि इतर नेत्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे तेही ऐकून घेतलं.
यावेळी संजय राऊत यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. अहंकाराने देश चालत नाही, शेतकऱ्यांचं आंदोलन हे फक्त पंजाब किंवा एखाद्या राज्याचं आंदोलन नाही. हा संपूर्ण देशाचा विषय आहे हे मोदी सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. सरकारने आता तरी शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे आणि लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, फक्त अहंकाराने देश चालत नाही असंही संजय राऊत यांनी यावेळी सुनावलं.
दिल्लीत कशाप्रकारे बंदोबस्त करण्यात आला हेच हा फोटो सांगतो आहे
गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृषी कायदे रद्द केले पाहिजेत ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आज आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.
ADVERTISEMENT