गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजी आहे अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज झाले, तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरून दोघांमध्ये नाराजी आहे असं दबक्या आवाजात बोललं जात होतं. त्यानंतर अंधेरी पूर्व भागात होणाऱ्या पोटनिवडणुकीवरूनही काही तर्क लढवले गेले. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनीच या सगळ्याबाबत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी?
सध्याच्या परिस्थितीत काही पत्रकारांना उद्योगच उरले नाहीत. त्यांना विपरीत बातम्या मिळत नाहीत. त्यामुळे ते अशा मजेदार बातम्या तयार करत आहेत. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीचा खूप आनंद घेतला आणि आम्ही यावर मनापासून हसलो. असल्या फॅक्टरीतून तयार झालेल्या बातम्यांवर आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? असा प्रश्न करत त्यांनी या सगळ्या चर्चा म्हणजे अफवा आहेत असंच स्पष्ट केलं आहे.
धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत डेफिनेटिव्ह अॅग्रीमेंटवर सह्या करण्यात आल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी नाराजीच्या प्रश्नावर उत्तर दिलं.
महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड कार्गो रेल्वे?
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड आणि हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावरही अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली. याबाबत ते सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असंही केंद्राच्या वतीने सांगण्यात आल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.
एअर इंडियाची इमारत महाराष्ट्राला
देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली आणि मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती केली. फडणवीस म्हणाले, सध्या मंत्रालय आणि अॅनेक्स इमारत मिळूनही शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे या इमारतीची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात तो प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला आहे.
ADVERTISEMENT