मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा हात आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्या मनात 100 टक्के आदर आहे असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. मात्र शिवसेनेला अमोल कोल्हे यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
पुणे-नाशिक महामार्गावर खेड-घाट व नारायणगाव बायपास उद्घाटनावरून पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघात दोन दिवस चांगलंच राजकारण बघण्यास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज या दोन्ही बायपासचं उद्घाटन केलं. मात्र शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी अढळराव यांनी बायपासचं शिवसैनिकांना घेऊन अचानक उद्घाटन केलं त्यावरून अमोल कोल्हे यांनी टीका केली.
आज शनिवारी सकाळी खेड बायपास व दुपारी नारायणगाव बायपासची अधिकृत उद्घाटने करत डॉ अमोल कोल्हे यांनीही आढळराव यांच्यावर चांगलीच बोचरी टीका केली. माजी आमदार शरद सोनवणे व माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्यावर कोटी केली. ‘निवडणुकीनंतर पद गेल्यानंतरची ही अस्वस्थता राज्यात अनेकांना आहे. दुर्दैवाने शिरुरमध्ये सुद्धा आढळराव बैचेन आहेत. त्यातूनच त्यांनी हे काल हे उद्घाटन केलंय. इतक्या वयस्कर व्यक्तीने असं वागणं बर नाही.’ राज्यपातळीवरही अशीच अस्वस्थता बघायला मिळते आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता टोलेबाजी केली आहे.
शिवसंपर्क अभियानावावर बोलताना डॉ कोल्हे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमच्याही मनात आदर आहे. 100 टक्के आदर आहे. मुख्यमंत्र्याविषयी आदर नसता तर आज जे आरोप करतात त्यांनी माझी संसदेतील भाषणे बाहेर काढून पाहावीत. त्रास होईल मला संसदेत बोलताना बघून, पण एकदा भाषण काढून बघा ना. महाराष्ट्र सरकारची, माननीय मुख्यमंत्र्यांची बाजू संसदेत अभिमानाने कोण मांडतं हे तुम्हाला समजून जाईल आणि मग सांगा आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे किंवा नाही. पण या मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामं लोकांपर्यंत पोहचवावी, महाविकास आघाडीचं काम लोकांपर्यंत पोहचावं म्हणून या अभियानाची सुरुवात करायला दिली पण या अभियानाची काम सोडून फक्त आमच्यावर टीका करणं हाच जर एककलमी कार्यक्रम असेल आणि हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावामागे लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो माननीय मुख्यमंत्र्याबद्दल आदर आहे मात्र ते मुख्यमंत्रिपदावर आहेत ते कारण आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे.’
पुणे नाशिक महामार्गवरील खेड घाट बायपासच्या कामाच्या वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर काल चांगलाच निशाणा साधला होता आणि शिवसैनिकांसोबत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला होता. आता आज डॉ. अमोल कोल्हे यांनी याच सगळ्या प्रकारावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे तसंच मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात आहे म्हणून ते मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT