मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि मुंबई महापालिकेचे कंत्राटदार यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. याच डायरीतील एक उल्लेख असा आहे की, ज्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नावही ‘मातोश्री’ आहे. त्यामुळेच आता या प्रकरणातील गांभीर्य वाढलं आहे. दरम्यान, डायरीत ‘मातोश्री’च्या उल्लेखावरून आयकर विभागाने यशवंत जाधव यांची चौकशी केली असता त्यांनी आयकर विभागाला असं सांगितलं की, 50 लाख रुपये किंमतीचं हे घड्याळ त्यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिलं होतं. तर दुसरीकडे, गुढीपाडव्याला त्यांनी आईच्या स्मरणार्थ गरजूंना 2 कोटींच्या भेटवस्तू दिल्याचं सांगितलं आहे.
यशवंत जाधव यांच्या पत्नीचे शपथपत्र अन् आयकर विभागाची कारवाई
यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळ्याच्या आमदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. याच प्रतिज्ञापत्रातून कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांनी भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे 15 कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.
न्यूजहॉक कंपनीच्या व्यवहारांचीही चौकशी केली
दोन संशयास्पद नोंदींव्यतिरिक्त, विभाग न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध व्यवहारांची देखील आता आयकर विभाग चौकशी करत आहे. कंत्राटदार बिमल अग्रवाल हे या कंपनीचे मालक आहेत. सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाने अग्रवाल यांची यापूर्वीच चौकशी केली आहे. यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या 30 कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा संशय आहे.
31 फ्लॅट केले खरेदी
जाधव यांनी भायखळा येथील बिलकाडी चेंबर्स येथे न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 31 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आहे. जाधव यांनी कथित स्वरुपात इमारतीतील चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिले होते. आयकर विभाग इतर चाळीस मालमत्तांचीही चौकशी करत आहे. या मालमत्ता जाधव यांच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे.
1.75 कोटींना हॉटेल केले खरेदी, 20 कोटींना विकले
जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळा येथे इंपिरियल क्राउन नावाचे हॉटेल खरेदी केले होते. हे हॉटेल न्यूजहॉक मल्टीमीडियाने भाड्याने घेतले होते. यानंतर न्यूजहॉकला बीएमसीकडून क्वारंटाइन सेंटरचे कंत्राट मिळाले होते. हे हॉटेल 1.75 कोटींना विकत घेण्यात आले होते, परंतु नंतर सुमारे वर्षभरात 20 कोटींना त्याची विक्री करण्यात आली. दरम्यान, या हॉटेल खरेदी व्यवहारात आता प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.
जाधव यांनी मंजूर केलेल्या कंत्राटांची मागवली माहिती
यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना एप्रिल 2018 पासून मंजूर झालेल्या कंत्राटांची माहिती आयकर विभागाने बीएमसीकडून मागवली आहे. याशिवाय सर्व कंत्राटदारांचा तपशील आणि त्यांना बीएमसीने केलेल्या पेमेंटचीही माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात यशवंत जाधव आणि शिवसेनेच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT