अवघ्या १५ मिनीटांत दगडाने ठेचून दोन जणांची हत्या करणाऱ्या सायको किलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रमण राघव, बिअर मॅन यासारख्या सायको किलरनंतर या आरोपीने आपली दहशत निर्माण केली होती. सुरेश शंकर गौडा असं या आरोपीचं नाव असून त्याला जे.जे.मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. २०१५ सालीही आरोपी सुरेशने अशाच प्रकारे कुर्ल्यात एका व्यक्तीची हत्या केली होती.
ADVERTISEMENT
शनिवारी भायखळा आणि जे.जे. मार्ग परिसरात दोन मृतदेह आढळून आले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही मृतदेह हे फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तींचे होते, सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला असता पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं. आरोपी सुरेशने पेव्हर ब्लॉक डोक्यात टाकून या व्यक्तींची हत्या केली. महत्वाची गोष्ट म्हणजे चौकशीदरम्यान त्याने या हत्या सहज केल्याचं सांगितलं.
आरोपी सुरेश गौडाने अशाच प्रकारे शहरात आणखी काही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तींच्या हत्येच्या केसेस मुंबई पोलीस पुन्हा एकदा तपासणार आहेत. २०१५ साली कुर्ला येथे झालेल्या एका हत्या प्रकरणात सुरेश गौडाला अटक झाली होती, परंतू सबळ पुराव्याच्या अभावी २०१६ साली त्याची सुटका झाली. सध्या आरोपी तुरुंगात असून भायखळा पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत.
ADVERTISEMENT